बसवकल्याणच्या अनुभव मंटपासाठी ५०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:54+5:302021-01-08T05:02:54+5:30
भालकी : १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी बसवकल्याण येथे जगातील प्रथम संसद अनुभव मंटपाची स्थापना केली. या अनुभव ...
भालकी : १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी बसवकल्याण येथे जगातील प्रथम संसद अनुभव मंटपाची स्थापना केली. या अनुभव मंटपासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. यदीयुरप्पा यांनी बुधवारी दिली.
बसवकल्याण येथील अनुभव मंटपाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, बिदरचे पालकमंत्री प्रभू चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, गुरुचण्णबसप्पा, बस्वराज पाटील शेडम, खासदार भगवंत खुब्बा, आमदार ईश्वर खंड्रे, विश्व बसव धर्म ट्रस्टचे अध्यक्ष बसवलिंग पठदेवरु, आमदार राजशेखर पाटील हुमनाबादकर, रघुनाथ मलकापुरे, डॉ. चन्नवीर शिवाचार्य हारकुड, बेंगळुरुच्या बसव समितीचे अरविंद जत्ती, सिद्राम शरणरु, महामंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र बेलदाळे, खासदार उमेश जाधव, आमदार दत्तात्रय पाटील, सूर्यकांत नागमारपल्ली, डॉ. शिवानंद महास्वामी हुलसूर, अक्क अन्नपूर्णा, डॉ. निलांबिका पाटील, राजशेखर शिवाचार्य मेहकर, आमदार सुशील नमोशी, अनिल भुसारे, शरणू सलगर, चंद्रशेखर पाटील, माजी मंत्री भीमण्णा खंड्रे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी म्हणाले, गरजू, गरिबांना घर मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी बसव वस्ती योजना लागू केली आहे. यावेळी ईश्वर खंड्रे यांनीही मार्गदर्शन केले. एच. आर. महादेव प्रसाद यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर नवलिंग पाटील यांनी आभार मानले.
दोन वर्षात काम पूर्ण होणार...
मुख्यमंत्री बी. एस. यदीयुरप्पा म्हणाले, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर व शरण यांचे विचार, वचन संपूर्ण विश्वात आणले. विश्वातील जातीभेद दूर होऊन सर्वांनी एकत्र येऊन आपले प्रश्न मांडावेत यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली होती. या अनुभव मंटपाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे, हे माझे पूर्व जन्मातील पुण्य आहे. अनुभव मंटपासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करुन घेतला असून, त्यातील १०० कोटी दिले आहेत. आठवडाभरात आणखीन १०० कोटी देण्यात येतील. दोन वर्षात हे काम पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.