५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ
By हरी मोकाशे | Published: June 22, 2023 07:40 PM2023-06-22T19:40:30+5:302023-06-22T19:40:36+5:30
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात.
लातूर : हरभरा खरेदीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला. उर्वरित ५ हजार ५३९ शेतकरी केंद्राकडे आलेच नाहीत. या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणावा म्हणून केंद्र चालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. दरम्यान, गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता.
नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १५ फेब्रुवारी ते ११ जून या कालावधीत हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केली आहे.
१४५ कोटींचा हरभरा खरेदी...
नाफेडच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केलेला हरभरा हा १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये किमतीचा आहे.
दीड कोटी रक्कम थकीत...
हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या १८ हजार ९६८ शेतकऱ्यांपैकी १८ हजार ८१४ शेतकऱ्यांना १४४ कोटी १३ लाख ६७ हजार ६२० रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ७७ हजार ८२५ रुपये थकीत राहिले आहेत. ११ जूनपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत.
बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण...
खुल्या बाजारपेठेत कमी भाव असल्याने आम्ही हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली. हरभरा विक्री करून जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्यापही रक्कम मिळाली नाही. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर...
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्याची रक्कम १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार आहे. १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख थकीत राहिले आहेत. ते लवकरात लवकर मिळावेत म्हणून पाठपुरावा सुरू आहे. तसेच जवळपास साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.