५११ ग्रामसेवकांना जि.प.कडून नोटिसा

By Admin | Published: July 5, 2014 11:52 PM2014-07-05T23:52:21+5:302014-07-06T00:25:56+5:30

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़

511 Gram Sevaks notice from ZP | ५११ ग्रामसेवकांना जि.प.कडून नोटिसा

५११ ग्रामसेवकांना जि.प.कडून नोटिसा

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़ ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकावर १० ते १२ गावांच्या कारभाराचा भार टाकण्यात आला असला तरी तो अपुरा पडत आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना सात दिवसांत कामावर हजर राहण्याच्या सूचना देत नोटिसा बजावल्या आहेत़
जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ७८७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी शंभर ग्रामविकास अधिकारी, ४११ ग्रामसेवक आहेत़ या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे़ दहावी, बारावी आणि इतर वर्गांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़ त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता सध्या विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे़ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ग्रामपंचायतीच्या विविध कागदपत्रांची आवश्यकता असते़ त्याचबरोबर पावसाने ताण दिल्याने टंचाईने तीव्र रुप धारण केले आहे़ त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ तसेच निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे़ आचारसंहितेमुळे अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत़ अशा परिस्थितीत ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी अडचण होत आहे़
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक ग्रामसेवकाकडे किमान दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे़ त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना ग्रामसेवकाच्या कागदपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असे़ आता ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे तर मोठी गैरसोय होत आहे़
परिणामी, ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींचे दोन दिवसांपासून कुलूपही उघडेनासे झाले आहे़ विविध कामानिमित्ताने नागरिकांचे हेलपाटे सुरु आहेत़ दरम्यान, प्रशासनाने त्याची दखल घेत काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले़ त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांना शुक्रवारी नोटिसा बजावल्या आहेत़(वार्ताहर)
नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून जिल्ह्यातील २३ विस्तार अधिकारी आणि ९७ कंत्राटी ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे़ प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकास किमान १०- १२ गावांचे काम पहावे लागत आहे़ तसेच पंचायत समितीच्या फलकावर तात्पुरत्या ग्रामसेवकांची यादी डकविण्यात आली आहे़
ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची वेतन त्रुटी दूर करावी, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु करावी़, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा़, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे़, प्रवासभत्ता वेतनासोबत ३ हजार रुपये करावा़
आंदोलनात सहभागी झालेले ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़ ७ दिवसांत कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले यांनी सांगितले़

Web Title: 511 Gram Sevaks notice from ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.