आंदोलनाच्या धास्तीने ५३ टक्के बस फेऱ्या रद्द; दिवसभरात २० लाखांचा व्यवसाय बुडाला
By आशपाक पठाण | Published: February 17, 2024 06:20 PM2024-02-17T18:20:06+5:302024-02-17T18:20:26+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
लातूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको, उपोषणे सुरू आहेत. याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर झाला आहे. शनिवारी खबरदारी म्हणून लातूर विभागातून लांब पल्ल्याच्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. ५३ टक्के बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यात जवळपास २० लाखांचा व्यवसाय बुडाला आहे.
लातूर आगारातून शनिवारी पहाटे ४ वाजेपासूनच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हाबाहेर जाणारी एकही बस सोडण्यात आली नाही. महामंडळाच्या लातूर विभागातून दिवसभरात १ हजार ६४९ बसफेऱ्या होतात. शनिवारी ६०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळसह ग्रामीण भागातील बसेस सुरू आहेत. मराठा आंदोलनामुळे खबरदारी राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचाही यात समावेश आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपाेषणाला बसल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढली जात आहेत. त्यामुळे शुक्रवारीही लातूर आगारातून लांब पल्ल्याच्या सर्व बसेस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. शनिवारीही जिल्ह्याबाहेर जाणारी सर्व बसेस थांबविण्यात आली आहेत.
खबरदारी म्हणून महामंडळाचा निर्णय...
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून लांब पल्ल्याच्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या ५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. शनिवारी तर विभागातून ६०३ फेऱ्या झाल्या आहेत. यात महामंडळाचा २० लाख ४ हजार ९६० रूपयांचा व्यवसाय बुडाला आहे. - संदीप पडवळ, जिल्हा वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ.