बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला
By राजकुमार जोंधळे | Published: September 6, 2022 05:08 PM2022-09-06T17:08:37+5:302022-09-06T17:09:13+5:30
दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : येथील राज्यमार्गावर शहराच्या मध्यभागी नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेवर सोमवारी मध्यरात्री टाकण्यात आलेल्या दरोड्यात गॅसकटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिसांनी तो सिलेंडर जप्त केला आहे. अतिशय शिताफीने दराेडेखाेरांनी दराेडा टाकत तब्बल २७ लाखांची राेकड आणि ३१ लाखांचे साेने असा जवळपास ५९ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ शहरातून गेलेल्या राज्यमार्गालगत नगरपंचायतची दुमजली इमारत आहे. तळमजल्यात नगरपंचायत कार्यालय असून, दुसऱ्या मजल्यावर महाराष्ट्र ग्रामीण बॅकेची शाखा कार्यरत आहे. सध्याला नगरपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून, तळमजल्यातील काही भिंतींचे ताेडकाम करुन नुतनीकरण केले जात आहे. परिणामी, चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश करून चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्याचबराेबर बॅंकेच्या दाराला लावलेले कुलूपही दराेडेखाेरांनी ताेडले. यासाठी आवश्यक गॅस कटर, सिलेंडर साेमबत आणत हा धाडसी दराेडा दराेडेखाेरांनी टाकला. बॅकेतील तिजोरी त्याचबराेबर त्याचे लाॅकर कटरच्या मदतीने कट करून तब्बल २७ लाख १२ हजार ८३० रुपयांची राेकड, तसेच साेने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या एकंदर १४ कर्जदाराचे ३१ लाख ७९ हजार १७६ रूपयांचे सोने असा एकूण ५८ लाख ९४ हजार ६ रूपयाचा मुद्देमाल पळविला आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला...
दराेडेखाेरांनी अतिशय शिताफिने हा दरोडा टाकल्याचे समाेर आले आहे. बॅकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद हाेणार नाही, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याना बॅकअप रेकाॅर्ड करुन ठेवणारा डीव्हीआरच दराेडेखाेरांनी पळविला आहे. यातून दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केला असावा, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.
तीन तपास पथके तैनात...
शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात आजपर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिकारी अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दराेडेखाेरांच्या अटकेसाठी तातडीने तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह तीन पथके तैनात करण्यात आली आहे.