अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
By संदीप शिंदे | Published: May 15, 2023 07:46 PM2023-05-15T19:46:29+5:302023-05-15T19:46:44+5:30
या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अहमदपूर : महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील राळगा शिवारातील ६० ब्रास अवैध वाळूचा साठा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व नायब तहसीलदार गोविंद पेद्देवाड त्यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला. या जप्तीने वाळू वाहतूक व साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील राळगा या गावातील गट क्रमांक १६३ व १६५ या दोन शिवारांत वाळू साठविल्याचे १२ मे रोजी कळाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व नायब तहसीलदार गोविंद पेद्देवाड यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून अवैध साठवणूक केलेली वाळू जप्त केली. ही वाळू महसूल विभागाच्या वतीने अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात आणून ठेवली आहे. या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या कारवाईत मंडळ अधिकारी नागनाथ कवठे, तलाठी महेश गुंपिले, तलाठी प्रशांत बिराजदार, तलाठी संतोष खोमणे, मंडळ अधिकारी विशाल केंचे, तलाठी माधव जोशी, तलाठी नवनीत जामनिक, तलाठी दिंगाबर मेंडके, सिद्धार्थ कांबळे, आकाश कंधारकर, गोपाळ कासले, पोलिस कर्मचारी गाडे, पोलिस कर्मचारी आरदवाड यांचा सहभाग होता. अवैध वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक व साठवणूक होते. वाळू विक्रीचा व्यवसाय हा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होतो. वाळू वाहतूक व साठवणूक यावर प्रशासनाची नजर आहे. तालुक्यात वाळूउपसा, वाहतूक किंवा साठवणूक होत असल्यास महसूल विभागास कळवून सहकार्य करावे, असेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
वाळूचोरीविरोधात प्रशासनाची मोहीम...
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व निलंगा या दोन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. याबाबत वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शुक्रवारी राळगा शिवारात कारवाई करीत ६० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, तहसील प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आगामी काळातही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.