पावसाची उघडीप, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ६० टक्के नुकसान
By संदीप शिंदे | Published: August 31, 2023 06:20 PM2023-08-31T18:20:14+5:302023-08-31T18:20:57+5:30
१०० गावात रॅन्डम सर्वे; कृषी, विमा कंपनीचा प्राथमिक पाहणी अहवाल
औराद शहाजानी : गेल्या महिनाभरापासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून, खरीपातील पिके हातातून गेली आहेत. शासनाने पावसाचा २१ दिवसांचा खंड असल्यास रॅन्डम सर्वेक्षण करुन २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाला आदेशित केले आहे. त्यानुसार तालुक्यातील ३ मंडळातील १०० गावात कृषी विभाग व पिकविमा कंपनीकडून करण्यात आलेल्या पाहणी खरीप पिकांचे ६० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
निलंगा तालुक्यातील तीन कृषी मंडळातील व दहा महसूल मंडळातील १०० गावातील ३ हजार ९४७ हेक्टर सोयाबीनचा रॅन्डम सर्वे करण्यात आला. यात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. निलंगा, औराद व कासार शिरसी अशी तीन कृषी मंडळ आहेत. यात दहा महसुल मंडळे असून, यामध्ये औराद, हलगरा, कासार बालकुंदा, निलंगा, मदनसुरी, भूतमुगळी, कासारशिरसी, अंबुलगा, निटूर, पानचिंचोली या महसूल मंडळातील प्रत्येकी दहा गावाप्रमाणे शंभर गावे रॅडम पद्धतीने निवडण्यात आली होती. तालुक्यात ६९ हजार ५११ हेक्टवर साेयाबीन पेरा करण्यात आला आहे.
कृषी, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात...
ऑगस्ट महिना काेरडा गेल्याने खरीप पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. शासनाने कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांना संयुक्त नुकसानीची पाहणी करून २५ टक्के नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यात देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी आदेशित केले हाेते. याप्रमाणे निलंगा तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी सुनील घारोळे, आर.एम. राठोड यांच्यासह सहा कृषी पर्यवेक्षक, ३६ कृषी सहाय्यक, दहा विमा कंपनीचे प्रतिनिधी या टीमने २२ ते ३० ऑगस्टदरम्यान शेतात जाऊन रॅडम नुकसानीचा सर्वे केला. यात प्राथमिक अंदाजाप्रमाणे सोयाबीनचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांनी सांगितले.