हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेले ६ हजार शेतकरी झाले भूर्रर!
By हरी मोकाशे | Published: May 12, 2023 06:09 PM2023-05-12T18:09:48+5:302023-05-12T18:10:32+5:30
हमीभाव केंद्र : जिल्ह्यात २ लाख ६२ हजार क्विंटलची खरेदी
लातूर : शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा म्हणून नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १६ हमीभाव खरेदी सुरू आहेत. दरम्यान, हरभरा विक्रीसाठी २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार १९७ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली असून ६ हजार १३० शेतकऱ्यांची खरेदी शिल्लक आहे. या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करावा म्हणून नाफेडच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरिपातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. अति पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प भरले. त्यामुळे जिल्ह्यात रबीच्या क्षेत्रात वाढ होऊन जवळपास १ लाख ६५ हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता.
हरभऱ्याची काढणी सुरू होऊन बाजारात आवक सुरू होताच दर घसरले. हमीभावापेक्षा कमी दर मिळू लागला. त्यामुळे जिल्ह्यातील २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेडकडे नोंदणी केली.
९५ कोटी ९४ लाखांच्या हरभऱ्याची खरेदी...
हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या २४ हजार ५०८ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १६ खरेदी केंद्रावर १८ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६२ हजार ४६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. त्याची रक्कम ९५ कोटी ९४ लाख ४० हजार ३४४ रुपये आहे. आतापर्यंत ८९ कोटी ३६ लाख ४९ हजार १२३ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
सोमवारपर्यंत ६ कोटी होणार खात्यावर...
जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ४६ क्विंटल हरभरा खरेदी झाली. त्यापैकी ८९ कोटी ३६ ४९ हजार १२४ रुपये हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ६ कोटी ५ लाख ७१ हजार २२० रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.
जिल्ह्यात साडेनऊ लाख क्विंटल खरेदी...
नाफेडसह महाफार्मर प्रोड्युसर कंपनी, महाकिसान आणि अन्य एक संस्था अशा चार ठिकाणी एकूण १० लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत एकूण ९ लाख ४० हजार ७७८ क्विंटल खरेदी झाली आहे. ११ जूनपर्यंत हरभरा विक्रीसाठी मुदत आहे.
बाजारपेठेत ६०० रुपयांनी दर कमी...
केंद्र शासनाने हरभऱ्यास ५ हजार ३३५ रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर केला आहे. बुधवारी बाजार समितीत ६ हजार १११ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ४ हजार ७२५ रुपये असा मिळाला. क्विंटलमागे शेतकऱ्यांना जवळपास ६१० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांकडे पाठपुरावा...
नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री करावी म्हणून सूचना करून पाठपुरावा केला जात आहे. अद्यापही ६ हजार ३१० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी शिल्लक आहे.
- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.