लातूर जिल्हा परिषदेच्या ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी लागली पदोन्नतीची लॉटरी
By हरी मोकाशे | Published: October 19, 2022 05:37 PM2022-10-19T17:37:48+5:302022-10-19T17:38:15+5:30
जिल्हा परिषद : कार्यात्मक दर्जा वाढण्याबरोबरच वेतनातही वाढ
लातूर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपासून पदोन्नतीचे वेध लागले होते. अखेर बुधवारी समुपदेशनाने पदाेन्नतीची प्रक्रिया पार पडली असून ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पदोन्नतीची लॉटरी लागली आहे. त्यामुळे पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे चेहरे आनंद अन् हास्याने फुलल्याचे पहावयास मिळाले.
सप्टेंबर सुरु झाला की जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे वेध लागतात. यंदाही सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सर्व विभागांना पात्र कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, पदोन्नतीची प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी पदोन्नती निवड समितीची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानुसार सामान्य प्रशासन, पंचायत, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाने पदोन्नतीसाठीचे प्रस्ताव सादर केले होते.
बुधवारी सकाळी सीईओ अभिनव गोयल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या नियंत्रणाखाली पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर आदींची उपस्थिती होती.
जागेवरच दिले पदोन्नतीचे आदेश...
जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सहा विभागातील १३ संवर्गातील ६२ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नती झाली. समुपदेशनामुळे सदरील कर्मचाऱ्यांस रिक्त पदे दाखविण्यात आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अपेक्षित ठिकाण मिळविता आले. याशिवाय, पदोन्नतीचे आदेशही विनाविलंब जागेवरच देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा जिल्हा परिषदेकडे येण्याची गरज भासणार नाही.
पदोन्नती मिळालेले कर्मचारी...
सामान्य प्रशासन - १४
पंचायत विभाग- २
कृषी - २
अर्थ- ६
पशुसंवर्धन- १२
आरोग्य - २५
समुपदेनामुळे कर्मचाऱ्यांत आनंद...
पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करुन त्यावर हरकती मागविण्यात आल्या. अपात्र ठरलेल्या तिघांपैकी दोघांनी आवश्यक माहिती सादर केल्याने त्यांचे प्रस्ताव पदोन्नतीसाठी मान्य करण्यात आले. सीईओंच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया समुपदेशनाने झाली. त्यामुळे पारदर्शकता येण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही अपेक्षेप्रमाणे ठिकाण निवडता आले आहे.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.
प्रशासकराजमध्ये पहिल्यांदाच गर्दी...
पदोन्नीसाठी जिल्ह्यातील पात्र कर्मचारी आल्याने जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृहासमोर गर्दीच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. प्रत्येक कर्मचारी मोठ्या आतुरतेने आणि उत्साहाने एकमेकांशी संवाद साधत होते. प्रशासकराज आल्यानंतर पहिल्यांदाच एवढी गर्दी पहावयास मिळाली.