लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

By हरी मोकाशे | Published: July 27, 2024 07:03 PM2024-07-27T19:03:52+5:302024-07-27T19:05:14+5:30

आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के उपयुक्त पाणी

63 percent of average rainfall in Latur district; However, no water was seen in the project! | लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

लातूर : पावसाळ्यातील पावणेदाेन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत सरासरी ४४४.२ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत ६२.९१ टक्के पाऊस झाल्याने दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४०, तर १३४ लघुप्रकल्पांत केवळ १८.२० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांना दमदार वरुणराजाची आस कायम लागून आहे.

जिल्ह्यात यंदा मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला. त्यानंतर आर्द्राने उघडीप देत चिंता वाढविली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुनवर्सूमध्ये सतत रिमझिम पाऊस झाला. त्यानंतरच्या पुष्य नक्षत्राने मोठा दिलासा दिला. त्यामुळे प्रकल्पांत पाणी येण्यास सुरुवात झाली. परिणामी, आशा वाढल्या आहेत. जिल्ह्यात सरासरी ७०६ मिमी पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत ४४४.२ मिमी पाऊस झाला असून, तो ६२.९१ टक्के आहे. पावसामुळे पिके चांगली बहरली असली तरी जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

व्हटी प्रकल्प आला जिवंत साठ्यात...
जिल्ह्यातील आठपैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पांत शून्य पाणीसाठा होता. दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे व्हटी प्रकल्प जिवंत साठ्यात आला असून, १६.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. रेणापूर प्रकल्पात ५२.५१, देवर्जन- ३.८०, साकोळ- ३.११, घरणी- १३.१६, मसलगा प्रकल्पात ६६.३४ टक्के जलसाठा झाला आहे. सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के साठा झाला आहे. तावरजा आणि तिरू प्रकल्पात अद्यापही उपयुक्त पाणी नाही.

रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस...
तालुका - पाऊस (मिमी)
लातूर - ४५१.७
औसा - ४५७.१
अहमदपूर - ५२३.९
निलंगा - ४३०.२
उदगीर - ३९१.४
चाकूर - ४६३.४
रेणापूर - ५३६.७
देवणी - ३४४.७
शिरूर अनं. - ३५९.४
जळकोट - ३९७.५

मांजरा प्रकल्पात ०.७७ टक्के उपयुक्त पाणी...
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्प जिवंत साठ्यात आला आहे. सध्या १.३६६ दलघमी उपयुक्त साठा असून, ०.७७ अशी उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी आहे. तसेच निलंगा, औशाची तहान भागविणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात २७.६० टक्के उपयुक्त साठा झाला आहे.

४७ लघुप्रकल्प जोत्याखाली...
जिल्ह्यात एकूण १३४ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी ४७ प्रकल्पांतील साठा जोत्याखाली आहे. तीन प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे मोठा पाऊस होणे गरजेचे आहे. या लघुप्रकल्पांत केवळ १८.२० टक्के जलसाठा झाला आहे.

लघुप्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा...
तालुका - लघुप्रकल्प - साठा (टक्के)

निलंगा - ११ - २३.२१
अहमदपूर - २७ - २२.८२
रेणापूर - ६- ३७.८१
चाकूर - २० - ८.१९
देवणी - ११ - १२.४७
लातूर - ५ - २८.१०
औसा - १४ - १.२६
उदगीर - १० - ३०.५९
जळकोट - १० - १६.५५
शिरूर अनं. - १ - ००

Web Title: 63 percent of average rainfall in Latur district; However, no water was seen in the project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.