बियाणांच्या ८ कंपन्यांचे ६४ नमुने अप्रमाणित; विक्री बंदचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:50 PM2022-07-05T13:50:36+5:302022-07-05T13:51:31+5:30
खरीप हंगाम : कृषी विभागाकडून ३७३ नमुन्यांची तपासणी
- हरी मोकाशे
लातूर : शेतकऱ्यांना योग्य दरात दरात दर्जेदार बियाणे मिळावे म्हणून कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, गत दोन महिन्यांत जिल्ह्यात ३७३ बियाणांचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात आले. त्यात ८ कंपन्यांचे ६४ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने २५ दुकानांना सदरील कंपन्यांचे बियाणे विक्री करू नयेत, असे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात खरिपाचे साधारणत: ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत जवळपास १५० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे २ लाख ३० हजार ३७९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून १ लाख ८३ हजार ६६५ हेक्टरवर आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य दरात बी-बियाणे, खते, औषधे मिळावीत म्हणून कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले.
शासनाने यंदाच्या एप्रिल व मे महिन्यात बी-बियाणांचे ३४८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्या तुलनेत जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने एकूण ३७३ नमुने घेतले होते. हे नमुने तपासणीसाठी परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ६४ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सदरील बियाणे विक्री करणाऱ्या २७ कृषी सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या तर २५ दुकानांना सदर बियाणे विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ३७ दुकानांवर खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच खताचे १७८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पुण्याच्या खत विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात ७ कंपन्यांचे १५ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे तीन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ५ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
कायद्यानुसार कारवाई केली जाणार...
जिल्ह्यात बियाणे दुकानदार १ हजार ४०, खत दुकानदार ९४० तर, कीटकनाशक विक्री केंद्र ७९६ आहेत. शेतकऱ्यांना चांगली बियाणे, खते मिळावीत म्हणून कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. बियाणे, खत कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.