आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात 65 टक्के लसीकरण; दुसरा डोस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:54+5:302021-02-19T04:11:54+5:30
लातूर : शासकीय व खाजगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला ...
लातूर : शासकीय व खाजगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ११ हजार ३२५ जणांना लस देण्यात आली आहे. ६५.११ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, दुसरा डोसही देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर आता महसूल, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या लसीकरणालाही प्रारंभ झाला आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील १७ हजार ३९४ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ११ हजार ३२५ जणांना लस दिली गेली आहे. एकूण १५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ज्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली आहे आणि २८ दिवस पूर्ण झाले आहे, त्यांना दुसरा डोसही देण्यात येत आहे. ३४ हजार ४४८ डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. यातील १९ हजार ९५० डोस लसीकरण केंद्रावर पोहोचलेले आहेत. यातील १२ हजार १५८ डोस खर्च झाले आहेत. लसीकरण केंद्रावर ७ हजार ७९२ डोस उपलब्ध आहेत. तर जिल्ह्याच्या स्टोरेजमध्ये १८ हजार ५३० डोस उपलब्ध आहेत. आरोग्य, महसूल आणि पोलीस आदी फ्रंटलाइनवरील लाभार्थ्यांना लस दिल्यानंतर सर्वसामान्यांना मार्चपासून लस देण्याचे नियोजन आहे.
लस उपलब्ध आहे. मात्र लसीकरण संथगतीने सुरू आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. गरोदर मातांना लस देता येत नाही. बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांना लस देता येत नाही. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू असलेल्या व्यक्तीलाही लस देता येत नाही. प्रतिकार शक्ती कमी आणि काही आजार असतील तर लस दिली जात नाही. या सर्व बाबींची माहिती घेऊनच लस दिली जात आहे. त्यामुळे थोडा विलंब लागत आहे. पहिल्या टप्प्यासाठी फ्रंटलाइनमधील १७ हजार ३९४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ११ हजार ३२५ जणांना लस देण्यात आली आहे. प्रस्तुत कारणांची माहिती संकलित करून त्या-त्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संदेश जातो. त्यानंतर लस दिली जाते. आता चांगली गती आली असून, उद्दिष्टाजवळ आपण पोहोचलो आहोत.
१५ केंद्रांवर लस दिली जात आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर व्यक्तींना लस दिली जात आहे. फ्रंटलाइनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर महसूलची नोंदणी झालेल्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. पोलीस विभागातील ५७५ जणांची नोंद झाली असून, त्यातील २० टक्के लसीकरण झाले आहे. सीआरपीएफमधील ५०० जणांच्या नोंदणीपैकी २८५ जणांना लस देण्यात आली आहे. हेल्थ केअर वर्करमधील ज्यांना पहिला डोस देऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना दुसरा डोस दिला जात आहे.
- डाॅ. एल.एस. देशमुख,
जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर
सर्वसामान्यांना मार्चपासून मिळणार लस?
फ्रंटलाइनवरील कर्मचाऱ्यांना पहिला, दुसरा टप्पा असेल. त्यानंतर सर्वसामान्यांना लस देण्याबाबत नियोजन होणार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप शासनाच्या मार्गदर्शक सूचना नाहीत; परंतु १ मार्चापासून ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदी लसीकरणासाठी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
डाॅक्टर्स, नर्स, महसूल, पोलीस, सीआरपीएफमधील जवान यांना लस देणे सुरू आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल.