लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल ऑक्सिजन साठवण क्षमता
By हणमंत गायकवाड | Published: December 27, 2023 06:12 PM2023-12-27T18:12:16+5:302023-12-27T18:12:54+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क, दररोज 950 लिटर ऑक्सिजनची होतो तयार
लातूर : राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने शासनाच्या निर्देशानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाची यंत्रणा सतर्क झाली आहे. ऑक्सीजन बेड, औषधी व अन्य यंत्रसामग्री सज्ज करण्यात आली असून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी महाविद्यालय व रुग्णालय तयार आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल. ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. याशिवाय दररोज रुग्णालयातच ९५० लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्याचेही काम सुरू आहे.
मागे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय लातूर शहरांमध्ये झाली होती. आता नव्या व्हेरिंटचे काही भागात काही रुग्ण आढळले असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाकडून सर्व आरोग्य संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यंत्रसामुग्री तयार ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन साठवणूक क्षमतेसह औषधी आणि अन्यबाबी तयार केल्या आहेत.
दररोज आर्टिफिशियल चाचण्या परंतु कोरोना निरंक...
राज्यात काही भागात कोरोना रुग्ण आढळले असल्याने व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. पहिल्या लाटेपासून प्रयोगशाळा सुरूच असून दररोज चाचण्या केल्या जात आहेत. मात्र गेल्या एक दीड वर्षांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या पाच सहा दिवसांपासून चाचण्यांचे थोडे प्रमाण वाढविल्या असून त्यातही रुग्ण आढळलेले नाहीत तरीपण शासनाच्या सूचनेनुसार खबरदारी म्हणून सर्व तयारी करण्यात आली आहे.
- डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिक्षक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑक्सिजन साठवणुकीचे एकूण पाच टॅंक आहेत. दोन टॅंक मध्ये प्रत्येकी २१ केएल तर दुसऱ्या दोन मध्ये प्रत्येकी १० केएल, पहिल्या जुन्या टॅंकमध्ये ६ केएल ऑक्सीजन साठविण्याची क्षमता आहे. त्यामुळे कितीही गरज लागली तरी ऑक्सिजनची कमतरता आता भासणार नाही. चे महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ६७ केएल ऑक्सिजन साठवण्याची क्षमता आहे.
ऑक्सीजन निर्मिती होत असल्याने स्वयंपूर्ण...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आहेत. जिल्ह्यातल्या लागणाऱ्या दवाखान्यांना इथेच ऑक्सिजन तयार होत असल्यामुळे ऑक्सिजन बाबत लातूरचा शासकीय आरोग्य विभाग स्वयंपूर्ण झालेला आहे. शिवाय, लिक्विड ऑक्सिजन साठविण्याची क्षमताही आरोग्य विभागाने वाढविली आहे. त्यामुळे कितीही मोठी आपत्ती आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.