६८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

By Admin | Published: October 20, 2014 12:21 AM2014-10-20T00:21:48+5:302014-10-20T00:33:10+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांसह अपक्ष ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते

68 candidates deposit of deposit! | ६८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

६८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

googlenewsNext


लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांसह अपक्ष ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ६८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेसचे विजयी उमेदवार अमित देशमुख आणि भाजपाचे शैलेश लाहोटी यांच्यात लढत झाली. अमित देशमुख यांना १ लाख १९ हजार ६५६ तर लाहोटी यांना ७० हजार १९१ मते मिळाली. विजयी अमित देशमुख व पराभूत शैलेश लाहोटी या दोघांचा अपवाद वगळता अन्य २१ उमेदवारांना एकूण अवैध मतांच्या १/८ मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघातील ११ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसे, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अन्य सात अपक्ष उमेदवारांचीही अनामत १/८ मते मिळू शकली नसल्याने जप्त झाली आहेत. खुल्या प्रवर्गासाठी १० हजार, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ हजार रुपयांची अनामत रक्कम होती. ही रक्कम वाचविण्यात अपक्षांसह मान्यता प्राप्त पक्षाचे काही उमेदवार यशस्वी होऊ शकले नाहीत.
औसा विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार होते. काँग्रेसचे विजयी उमेदवार बसवराज पाटील मुरुमकर यांना ६३ हजार ९९१ तर शिवसेनेचे दिनकर माने यांना ५५ हजार १६१ मते मिळाली. तर भाजपाचे पाशा पटेल यांना ३७ हजार २५२ मते मिळाली आहेत. उर्वरित ११ उमेदवारांना १/८ मते मिळाली नाहीत. त्यामुळे या ११ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयी अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील यांना ६१ हजार ९५७ तर राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांना ५७ हजार ९५१ मते मिळाली आहेत. त्याखालोखाल भाजपाचे गणेश हाके यांना ५३ हजार ९१९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे विठ्ठल माकणे यांना ११ हजार ४०४ मते मिळाली आहेत. भारिप बहुजन महासंघासह अन्य सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या उमेदवारांनाही १/८ मते मिळाली नाहीत. उदगीर विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात अधिकृत पक्षाच्या चौघा जणांचा अपवाद वगळता ९ अपक्षांना १/८ मते मिळाली नाहीत. त्यामुळे या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना १/८ मते मिळत नाहीत, त्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते, असे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेवाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निलंगा विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपाचे विजयी उमेदवार संभाजी पाटील यांना ७६ हजार ८१७, काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांना ४९ हजार ३०६ आणि अपक्ष लिंबन महाराज रेशमे यांना १७ हजार ६७५, राष्ट्रवादीचे बस्वराज पाटील नागराळकर यांना १६ हजार १४९, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभय साळुंके यांना १६ हजार १५ व शिवसेनेच्या डॉ. शोभा बेंजरगे यांना ११ हजार ५२२ मते मिळाली. या सहा जणांचा अपवाद वगळता ९ जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

Web Title: 68 candidates deposit of deposit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.