विद्यार्थी,ज्येष्ठांना ७ किमीची पायपीट;सुनेगाव शेंद्रीकरांना ७७ वर्षांपासून बसची प्रतीक्षा! 

By संदीप शिंदे | Published: May 16, 2024 03:42 PM2024-05-16T15:42:51+5:302024-05-16T15:43:50+5:30

ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

7 km walk for students, senior citizens; Sunegaon Shendrikar has been waiting for a bus for 77 years! | विद्यार्थी,ज्येष्ठांना ७ किमीची पायपीट;सुनेगाव शेंद्रीकरांना ७७ वर्षांपासून बसची प्रतीक्षा! 

विद्यार्थी,ज्येष्ठांना ७ किमीची पायपीट;सुनेगाव शेंद्रीकरांना ७७ वर्षांपासून बसची प्रतीक्षा! 

अहमदपूर (लातूर ) : तालुक्यातील सुनेगाव शेंद्री गावात ७७ वर्षांत अजूनही बस पोहोचलेली नाही. आज ना उद्या बस गावात येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे.

सुनेगाव शेंद्री गावची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे. ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अहमदपूर शहरापासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथील नागरिकांना अहमदपूरला एकतर पायी यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावातून जवळपास अनेक विद्यार्थी पायीच ये-जा करतात. बससेवेअभावी ग्रामस्थांना सात किलोमीटर पायी यावे लागते. एसटी महामंडळाकडून काही ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

परंतु, बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना होत आहे. विशेष म्हणजे या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. भाडेही जास्तीचे घेतले जाते. प्रवासी जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करतात. सुनेगाव शेंद्री बससेवा सुरू व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही कुणीच दखल घेतलेली नाही. गावात केवळ प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी अहमदपूरला यावे लागते. बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज पायी जावे लागते. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. सुनेगाव शेंद्री येथून अनेक विद्यार्थी दररोज सात किलोमीटर पायी चालत जातात. अहमदपूर गाठावे लागते. गावात आजवर कधीच बस आली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे लोटली. ग्रामीण भागात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. रस्ते तयार झाले, वीज आली पण सुनेगाव शेंद्री गावात अद्याप एकदाही राज्य परिवहन महामंडळाची बस आली नसल्याने ग्रामस्थांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बससाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना ना शासन प्रतिसाद देते ना लोकप्रतिनिधी प्रतिसाद देतात.

बससेवा नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठांच्या अडचणी...
ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरळीत नाही, खेड्या-पाड्याच्या रस्त्यावर प्रवासाला बसशिवाय पर्याय नाही. सुरक्षित व वेळेत ये-जा करणाऱ्या बसमुळे प्रवाशांना आधार होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्याने अडचणी येत आहेत. याचाच फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे उचलत असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू आहे. अशा वाहनातून प्रवास करताना विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मतदानावर बहिष्कार टाकूनही बस मिळेना...
सुनेगाव शेंद्री गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली तरी गावकऱ्यांनी अद्यापपर्यंत गावात बस तर पाहिलीच नाही. परंतु गावाला पक्का रस्ता व पक्का पूल नाही. गावकऱ्यांनी पक्का रस्ता, पुलाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७ तसेच लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानावर बहिष्कार टाकून तो १०० टक्के यशस्वी करूनही अद्यापही गावाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे गावकरी गाेविंद काळे यांनी सांगितले.

Web Title: 7 km walk for students, senior citizens; Sunegaon Shendrikar has been waiting for a bus for 77 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.