७० वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; ३ दिवस मृतदेह घरात ठेवून नराधम छतावर झोपला
By राजकुमार जोंधळे | Published: August 27, 2024 06:16 PM2024-08-27T18:16:00+5:302024-08-27T18:27:17+5:30
वृद्धेचा मृतदेह साडीत बांधून घरात ठेवला, तीन दिवसांनी घटना उघडकीस; ३५ वर्षीय आरोपीला अटक
लातूर : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याची घटना साेमवारी भेटा (ता. औसा) येथे घडली. याबाबत ३५ वर्षीय आराेपीला अटक केली असून, भादा ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे. या घटनेने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील एका गावात वयोवृद्ध महिला मुलासह वास्तव्याला आहे. परिसरातील भेटा, भादा येथील लोकांच्या घरात घरकाम करून उदरनिर्वाह चालवित हाेती. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ती घरातून बाहेर पडली. मात्र, संध्याकाळी घरी परतलीच नाही. दरम्यान, वयोवृद्ध महिला भेटा येथे आली असता, मन्सूर सादिक व्होगाडे (वय ३५) याने त्या महिलेला घरात बोलावून घेतले. वयोवृद्ध महिलेचे हात-पाय बांधून अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला. मृतदेह खोलीतील लोखंडी रॉडला साडीत बांधून ठेवला. मयताच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशीही सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. साेमवारी सकाळी गावात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची चर्चा सुरू हाेती. चर्चा कानी पडल्यानंतर फिर्यादी मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हा मृतदेह फिर्यादीच्या आईचा असल्याची ओळख पटली. भादा पोलिसांनी एका आराेपीला अटक केली. याबाबत मयत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून भादा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक मुंडे यांनी दिली भेट...
भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सोमय मुंडे, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी भेट देऊन पाहणी केली.
पुण्यावरून आलेल्या आरोपीच्या आईने उघडला घराचा दरवाजा...
आरोपी मन्सूर व्होगाडे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्याच्या या वागण्याने आई, पत्नी त्याच्याजवळ राहत नाहीत. भाऊ दुसऱ्या गावी राहताे. एकटाच राहणारा आराेपी हा घटनेनंतर तीन दिवस पत्र्यावर झोपत होता. साेमवारी सकाळी त्याची आई पुण्याहून परतली. तिने घराचा दरवाजा उघडला आणि घटना उघड झाली.
अप्पर पोलिस अधीक्षकांनी काढली गावकऱ्यांची समजूत...
घटनेनंतर दोन्ही गावांतील लोकांमध्ये तीव्र संताप आहे. आरोपीला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.