लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र
By संदीप शिंदे | Published: January 4, 2023 06:45 PM2023-01-04T18:45:05+5:302023-01-04T18:45:37+5:30
पाचवीच्या ३५३ तर आठवीच्या ३४७ विद्यार्थ्यांचा समावेश
लातूर : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेला जिल्ह्यातून पाचवीचे १४ हजार ९६२ तर आठवीचे ९ हजार ५०० असे एकूण २४ हजार ४६२ विद्यार्थी सामोरे गेले होते. यामध्ये दोन्ही वर्गातील ७०० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील १७ हजार १५९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ९६२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी २ हजार ७३४ विद्यार्थी पात्र ठरले असून, ३५३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.आठवीच्या वर्गातील १० हजार ५४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ हजार ५०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. तर १००२ विद्यार्थी पात्र ठरले. तसेच ३४७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने शाळांस्तरावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जि.प.सह खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत यशाचा आलेख कायम ठेवला आहे.