3200 जागांसाठी 7 हजार उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:09+5:302021-01-08T05:01:09+5:30
सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीत लातूर तालुक्यातून ४२४, रेणापूर १२३, औसा २४९, ...
सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीत लातूर तालुक्यातून ४२४, रेणापूर १२३, औसा २४९, निलंगा २३९, देवणी २०६, शिरूर अनंतपाळ ११८, उदगीर ३३२, जळकोट १४८, अहमदपूर २५५, तर चाकूर तालुक्यातील १४५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र माघारी घेतले. १५ जानेवारी रोजी जवळपास ३ हजार १७३ सदस्य निवडीसाठी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, निवडणूक विभागाच्या वतीने तयारी केली जात आहे. जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ५२५ पुरुष तर ३ लाख १५ हजार ५४३ महिला मतदार आपल्या मतदानाचा १५ जानेवारीला हक्क बजावणार आहेत.
नळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७० उमेदवार
चाकूर तालुक्यातील नळेगाव मोठी ग्रामपंचायत असून, एकूण १७ जागांसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजकीय पक्षांसह अपक्षही या निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या रणधुमाळीत आहेत.
औराद शहाजानी ग्रामपंचायतीकडे लागले जिल्ह्याचे लक्ष
औराद शहाजानी ग्रामपंचायतीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूण १७ जागांसाठी पाच पॅनल आमने-सामने असून, ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात पॅनलचे ६८ उमेदवार तर अपक्ष १० उमेदवारांचा समावेश आहे. ११ हजार २३० मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीच्या लढतीकडे लक्ष लागले आहे.
तांदुळजा, जोडजवळा, गाधवडमध्ये लढत
लातूर तालुक्यातील तांदुळजा ग्रामपंचायतीच्या निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दोन पॅनल आमने-सामने आहेत. ११ जागांसाठी २८ उमेदवार या लढतीत आहेत. सर्वपक्षीयांचे दोन पॅनल आमने-सामने आहेत. त्यामुळे तांदुळजा पंचक्रोशीत ही निवडणूक बहुचर्चित आहे. सारसा, टाकळगाव, कानडी बोरगाव, गाधवड, जोडजवळा आदी गावांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होईल, असे चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. जिल्ह्यात २ हजार २३९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटपही करण्यात आले आहे, मतदानाच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
-गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग,