लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा ७२ फुट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ पुतळा; शानदार सोहळ्यात अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:06 PM2022-04-13T22:06:05+5:302022-04-13T22:07:38+5:30
Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने पार्क दुमदुमले
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जयंती उत्सव सोहळा यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ७२ फुटी ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’च्या अनावरणाचा शानदार सोहळा बुधवारी रात्री पार पडला.
या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. मंचावर खा. सुधाकर शृंगारे, खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ.टी.पी. कांबळे, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. पाशा पटेल, गुरुनाथ मगे, अरविंद पाटील निलंगेकर, शंकर शृंगारे, शैलेश लाहोटी, सिद्धलिंग स्वामी, भन्ते पय्यानंद, भन्ते महाथेरो, भन्ते नागसेन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक खा. सुधाकर शृंगारे यांनी केले. गेल्या २८ दिवसांपासून रात्रं-दिवस ७२ फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळ्यासाठी कलावंतांनी परिश्रम घेतले आहे. दरम्यान यामध्येही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावर मात करीत आम्ही हा पुतळा उभारला. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला सन्मान मिळतो. याच घटनेमुळे आज मी खासदार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. बाबासाहेबांची जयंती अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस होता. तो पूर्ण करताना मला आनंद होत आहे.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा पाहण्यासाठी आम्ही सोलापूरला जात होतो. आता परिस्थिती उलट आहे. आता लातूरची जयंती पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरप्रेमी येत आहेत.
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार...
ज्यावेळी मी महापौर झालो, त्यावेळी दीक्षाभूमीचा विकास करता आला. मुख्यमंत्री झालो त्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देता आली. शिवाय, लंडनमधील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले निवासस्थान स्मारक म्हणून उभा करता आले. या सर्व ऐतिहासिक क्षणाचा मला साक्षीदार होता आले, हे माझे मी भाग्य समजतो असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
समतेसाठी बाबासाहेबांचा लढा...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर विषमतेच्या विरोधात लढा उभारला. मानवी कल्याणाबरोबरच समता, न्याय, हक्कासाठी संघर्ष केला. जातीयवाद संपला पाहिजे, यासाठी बाबासाहेब आयुष्यभर लढत राहिले, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.