लातूरात ७२ लाखांच्या दारूचा ट्रक पळवणाऱ्या दराेडेखाेरांचा इतर जिल्ह्यांतही वावर !
By राजकुमार जोंधळे | Published: May 20, 2024 07:24 PM2024-05-20T19:24:44+5:302024-05-20T19:25:57+5:30
लातूर स्थागुशाखेच्या कारवाईत गुन्ह्यातील जीप, दुचाकी जप्त...
लातूर : धर्माबाद (जि. नांदेड) येथील कारखान्यातून काेल्हापूरकडे ७२ लाखांची दारूची वाहतूक करणारा ट्रकच दराेडेखाेरांनी पळवला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाैघांना धाराशिव जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून अटक केली. गुन्ह्यातील पांढऱ्या रंगाची जीप, बुलेट पाेलिसांनी जप्त केली आहे. हा गुन्हा किमान आठ ते दहा जणांनी केला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. या टाेळीचा इतर जिल्ह्यांतही वावर असल्याचे समाेर आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेला विदेशी दारूचा ट्रक चाकूर ते आष्टामोड दरम्यान पांढऱ्या रंगाची जीप आडवी लावून थांबवला. यावेळी चार ते पाच जणांनी ट्रकमध्ये घुसखोरी केली. चालकासह इतरांना चाकूचा धाक दाखवत स्टेअरिंगवर ताबा मिळवला. दरोडेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर चादर टाकली आणि हा ट्रक पुढे बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे परिसरात आणला. ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतरण्यास सांगत हातपाय बांधले आणि दारूसह ट्रक पळवला. दराेडेखाेरांच्या मागावर स्थागुशा हाेती. खबऱ्याच्या माहितीनुसार, धाराशिव आणि इतर ठिकाणांहून चाैघांना अटक केली. झाडाझडती घेत हिसका दाखवल्यानंतर दारू बाॅक्सचा सुगावा लागला. पाेलिसांनी ९०० दारूचे बाॅक्स, ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्यात वापरलेली बुलेट बार्शीतून चाेरल्याचे उघड...
दारूचा ट्रक पळविल्याच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट ही बार्शी (जि. साेलापूर) येथून आराेपींनी चाेरल्याचे समाेर आले आहे. पाेलिसांनी बुलेट मालकाचा शाेध घेतला आहे. आता जीपही हाती लागली आहे. आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? याचा शाेध घेतला जात आहे.
- संजीवन मिरकले, पाेनि., स्थागुशा, लातूर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला छडा...
ही कारवाई स्थागुशाचे पो. नि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि. संजय भोसले, रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे यांच्या पथकाने केली. यात सायबर सेलचे सपोनि. नलिनी गावडे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनीही सहकार्य केले.