लातूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९१ टक्के मतदान
By संदीप शिंदे | Published: May 7, 2024 10:35 AM2024-05-07T10:35:41+5:302024-05-07T10:35:59+5:30
अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क
संदीप शिंदे
लातूर : लातूर लोकसभा निवडणूकीसाठी मतदारसंघातील २१२५ मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९१ टक्के मतदान झाले असून, लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील मतदान केंद्रावर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देखमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.
लातूर लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. वाढत्या उन्हामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. लातूर शहरातील नर्गिस शाळा आलमपूरा परिसर, उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी, कंधार वेस, देवणी तालुक्यातील वलांडी या तीन केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड आल्याने मतदान काही वेळ थांबविण्यात आले होते.
या केंद्रावर अर्ध्या तासानंतर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत चालू असून, दुपारी उन्हाचा पारा अधिक राहत असल्याने नागरिक सकाळच्या वेळीच मतदानाचा हक्क बजावण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडून सखी केंद्र, पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, मतदारांसाठी विविध सूविधा केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.