साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटी
By Admin | Published: August 12, 2014 01:09 AM2014-08-12T01:09:10+5:302014-08-12T01:58:51+5:30
औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल,
औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे दिली.
लामजना येथील चौरस्त्यावर आ. बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. मंचावर माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ. वैजनाथ शिंदे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा लोकाभिमुख कारभार चालवीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमजोर माणसांमध्ये जिद्द निर्माण केली. सध्याचे सरकार त्या विचारातूनच राज्यकारभार चालवीत आहे. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सर्वधर्मसमभाव जोपासला जात आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. (वार्ताहर)
आमदार बसवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा पुतळा लामजना चौरस्त्यावर उभारला आहे. तो महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवरायांनी लोकाभिमुख प्रशासन कसे चालवायचे, याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी महाराष्ट्रधर्म वाढविला.