आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी
By आशपाक पठाण | Published: February 24, 2024 09:15 PM2024-02-24T21:15:31+5:302024-02-24T21:19:17+5:30
साळे गल्ली भागातून श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली.
लातूर : शहरातील साळे गल्ली भागातील ६० फुट रोडवर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचे महसूल विभागाकडून शनिवारी पंचनामे करण्यात आले आहेत. या घटनेत जळालेल्या सहा दुकानांचे जवळपास ८० ते ९० लाख रूपये नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
साळे गल्ली भागातून श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली. अग्नीशामन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे काम केले. दरम्यान, शनिवारी सकाळी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी राम झाडे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने दिलेल्या अहवालात ८० ते ९० लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद केल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली.
गोजमगुंडे कॉम्प्लेक्समधील फय्याज हुसेन शेख यांचे सोफा कुशन बनिवण्याचे साहित्य, तसेच तयार सोफे २०, शिलाई मशिन, सोफा कपडा, कॉम्प्युटर, लॅपटॉप, दुचाकी, प्लायवूड फ्रेम असे एकुण १५ ते २० लाख नुकसान झाले आहे. शकिल खुदबोद्दीन तांबोळी यांचे कॉस्मेटिक, क्रॉकरी साहित्याचे ११ लाखांचे नुकसान, इरफान शब्बीर पठाण यांचे मोबाईल, खेळणी साहित्याचे ८ ते १० लाख. सय्यद शहाबुद्दीन सुजाओद्दीन यांच्या अत्तर, परफ्यूमसह पुस्तके, टोप्या, रूमाल, टीव्ही, कॅमेरा आदींचे जवळपास २० ते २५ लाख, रहिम अमीर शेख यांचे कोल्ड्रींक्स, फ्रिज, टिव्ही, पान मटेरिअलचे ३ ते ३.५ लाखांचे नुकसान, इमरान गौसोद्दीन पटवेकर आदी सर्वांचे एकत्रित ८० ते ९० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात वर्तविला आहे.
दुकानदारांशी साधला संवाद...
आगीत नुकसान झालेल्या दुकानांची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांशी संवाद साधला. दरम्यान, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनीही प्रशासनाला सूचना करून पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले होते. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.