लातूर : औशाच्या इज्तेमात ८० हजार समाजबांधवांचा सहभाग
By आशपाक पठाण | Published: December 5, 2022 09:47 PM2022-12-05T21:47:50+5:302022-12-05T21:48:21+5:30
शांतता, शिस्त अन् संयमाचा संदेश, ७०० स्वयंसेवक कार्यरत
लातूर : आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासणे आवश्यक असून, विश्वशांतीची गरज आहे. मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश देण्याबरोबर कुरआनच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी औसा येथे आयोजित इज्तेमात पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत जवळपास ८० हजारांहून अधिक समाजबांधवांनी उपस्थिती लावली.
कोविडच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय होत आहेत, त्यासाठी ४० एकरावर बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत इज्तेमास्थळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित झाल्याने परिसर गर्दीने फुलला आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, आपल्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये, यासाठी औसा शहरापासून इज्तेमास्थळापर्यंत जागोजागी स्वयंसेवक उभे आहेत. प्रत्येक वाहनधारकांना मार्ग दाखविण्याचे काम करीत सावकाश जाण्याचा सल्ला देणारे तरुण प्रेम आणि आपुलकी दाखवित आहेत. इज्तेमास्थळी दोन ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. शिवाय, उपस्थित बांधवांना अत्यंत माफत दरात दर्जेदार जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय, इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी औसा शहरातील बसस्थानक, टी पॉईंपासून मोफत सोय करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक, धर्मगुरू कुरआन, हदीसवर बयाण (प्रवचन) करीत आहेत.
दवाखाना, रुग्णवाहिकेची सोय...
इज्तेमास्थळी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. शिवाय, रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरही सेवा देत आहेत. हजारो नागरिक उपस्थित असतानाही कोणालाही त्रास होणार नाही, यासाठी शेकडो स्वयंसेवक काळजी घेण्याचे काम करीत आहेत. संयोजकांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मिठाई, कपडे, अत्तरांचा सुगंध...
इज्तमास्थळी विविध प्रकारच्या खजूर, मिठाई, उबदार कपड्यांची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत. शिवाय, अत्तर, सुरमा, टोपी, मिस्वाकचीही दुकाने आहेत. इज्तेमासाठी औसा बसस्थानक किंवा टी पॉईंट आलेल्या नागरिकांना इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.