पावणेदोन लाख लाभार्थ्यांना ८ हजार क्विंटल मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:51+5:302021-07-21T04:14:51+5:30
अहमदपूर : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील १ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना ८ हजार ६०० क्विंटल धान्याचे मोफत ...
अहमदपूर : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील १ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना ८ हजार ६०० क्विंटल धान्याचे मोफत वाटप होणार असून, हे वाटप जुलै ते नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे. दरम्यान, शासनाने शेतक-यांना या योजनेचा लाभ दिला नसल्याने ३२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तालुक्यातील अंत्योदय योजनेतील २१ हजार ४०२ लाभार्थ्यांना ६४२ क्विंटल गहू व ४२८ क्विंटल तांदूळ मिळणार आहे. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ७९० लाभार्थ्यांना ४ हजार ५५० क्विंटल गहू व ३ हजार ३३ क्विंटल तांदूळ मिळणार आहे. या दोन्ही योजनेत प्रत्येक व्यक्तीस पाच किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहे. तालुक्यात एकूण १ लाख ७३ हजार ९२ लाभार्थींना ५ हजार १९२ क्विंटल गहू, तर ५ हजार ४६१ क्विंटल तांदूळ मिळणार आहे. ही योजना जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक महिन्याला तेवढ्यात प्रमाणावर या धान्याचे मोफत वाटप होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दिव्यांगांनी लाभ घ्यावा...
४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्या प्रत्येक दिव्यांगांना अंत्योदयची शिधापत्रिका मिळणार आहे. या योजनेचा लाभ देऊन मासिक पाच किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहा. दिव्यांगांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.
पाच महिने मोफत धान्य...
या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार असून, लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य उचलून घ्यावे, असे आवाहन पेशकार बालाजी मिठेवाड यांनी केले.
केंद्र शासनाच्या योजना...
केंद्र शासनाच्यावतीने अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना राबविण्यात येतात. राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून मोफत धान्य वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या योजनेतील शेतक-यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही.