लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ८१ हजार अर्ज
By आशपाक पठाण | Published: July 15, 2024 07:38 PM2024-07-15T19:38:43+5:302024-07-15T19:39:27+5:30
जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे; छाननी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी
लातूर: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच १२ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ८१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, छाननी आणि ऑनलाईन नोंदणीला गती गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सोमवारी येथे दिल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.
यात प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
३५ हजार २६६ अर्ज ऑनलाईन...
जिल्ह्यात आतापर्यंत ८१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३५ हजार २६६ अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून ४५ हजार ९५९ अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. योजनेसाठी पात्रतेच्या निकषात करण्यात आलेल्या बदलांबाबत ग्रामीण, शहरी भागात व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रेशन दुकानदार, तलाठी, कृषि सहायक, महिला बचतगटातील प्रेरिका (सीआरपी) यांच्यामार्फत नाव नोंदणी आणि प्राप्त अर्जांची छाननी व ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अधिक गतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.
रास्त भाव दुकानदारांचे सहाय्य घ्या...
ग्रामीण व शहरी भागातील अर्ज स्वीकृती केंद्रात प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या यादीचे नियमितपणे चावडी वाचन करावे. या चावडी वाचनाबाबत दवंडीद्वारे नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी. चावडी वाचनात नोंदविण्यात येणाऱ्या आक्षेपांचा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात यावा. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विविध योजनांच्या लाभार्थी महिलांची गावनिहाय यादी तयार करून त्यांची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेण्यात यावी. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक महिलांच्या नोंदणीसाठी रास्त भाव दुकानदारांचे सहाय्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी नेटके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख यांनी तालुकानिहाय प्राप्त अर्जांची माहिती दिली.