लातूर जिल्ह्यातील ८४ पाझर तलाव अमृत सरोवर योजनेतून पुनरुज्जीवित! पाणीटंचाईवर होईल मात
By हरी मोकाशे | Published: August 3, 2023 05:53 PM2023-08-03T17:53:56+5:302023-08-03T17:54:16+5:30
पाणीटंचाईवर मात : आणखीन ५०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
लातूर : केंद्र शासनाच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८४ पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्यामुळे टंचाई जाणवणाऱ्या गावांतील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जलसंचय होऊन ओलिताच्या क्षेत्रात जवळपास ५०० हेक्टरची वाढ होणार आहे. अमृत सरोवरांचा गावकरी अन् शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ७५ जलाशये निर्माण करण्याचे अथवा पुनरुज्जीवित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेस अमृत सरोवर योजना असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्यास ७५ अमृत सरोवर निर्मिती अथवा पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तेव्हा जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टाबरोबरच आणखीन २० पाझर तलाव दुरुस्तीचे नियोजन केले.
पावसाचे पाणी वाहून जाणे थांबणार...
जिल्ह्यात ९५ अमृत सरोवर पुनरुज्जीवत करण्यात येत आहेत. आतापर्यंत ८४ पाझर तलावांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ११ ठिकाणची कामे प्रगतीपथावर असून ती आठवडाभरात पूर्ण होतील. या अमृत सरोवरांमुळे पावसाचे वाहून जाणारे जमिनीत मुरणार आहे. त्यामुळे जलसाठ्याबरोबरच परिसरातील विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
तीन विभागांमार्फत कामे...
केंद्र शासनाच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत ७८, जिल्हा परिषदेअंतर्गत १३ आणि मनरेगाअंतर्गत ४ पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आहे. आतापर्यंत ८४ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. विशेष म्हणजे, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामे केली जात आहेत.
शेतीसाठी होणार लाभ...
अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच सिंचन क्षेत्रातही वाढ होणार आहे. जवळपास १९०० स.घमी. जलसाठा होईल. त्याचबरोबर आणखीन ५०० हेक्टर जमीन ओलिखाली येईल. त्यामुळे शेतीसही लाभ होणार आहे. शिवाय, तलावांच्या दुरुस्तीबरोबर सांडव्यांचीही दुरुस्ती झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर...
पिण्याच्या पाण्याबराेबरच शेतीच्या सिंचनासाठीही लाभ व्हावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यात आली. जिल्ह्यात ९५ तलावांची कामे करण्यात येत असून त्यापैकी ८४ पूर्ण झाली आहे. त्यामुळे १९०० स. घमी. जलसाठा होईल. तसेच आणखीन ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
- ए.एस. कांबळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी.
लातूर, उदगीरात सर्वाधिक अमृत सरोवर
तालुका- उद्दिष्ट - पूर्ण
अहमदपूर- ११ - ०९
औसा - १४ - १०
चाकूर - ०४ - ०४
देवणी - ०५ - ०५
जळकोट - १० - ०७
लातूर - १५ - १५
निलंगा - १२ - ०९
रेणापूर - ०३ - ०३
शिरुर अनं.- ०६ - ०६
उदगीर - १५ - १५
एकूण - ९५ - ८४