कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षापूर्वीचा शिलालेख; चालुक्यकालीन इतिहासाचा उलगडा
By राजकुमार जोंधळे | Published: October 9, 2022 09:43 PM2022-10-09T21:43:18+5:302022-10-09T21:45:19+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे. येथे असलेल्या शिलालेखाचे आजपर्यंत कुठेच वाचन झाल्याचे आढळून आले नसल्याने शिलालेख इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेऊन व कर्नाटक हरीहर येथील कन्नड शिलालेख अभ्यासक प्रा. रविकुमार नवलगुंडा यांनी वाचन केले.
औराद शहाजानी - निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षापूर्वीचा शिलालेख आढळून आला असून, यातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील चालुक्यकालीन इतिहासाचा उलगडा झाला आहे. चालुक्य राजा जगदेकमल्ल दुसरा यांच्या राजवटीत तो गोदावरीच्या प्रदेशावरून राज्य करत असताना मल्लर बिल्लय्या याने आजचे बालकुंदा येथे स्वयंभू सोमनाथ मंदिर बांधून व्यवस्थापनासाठी २७ मत्तर शेतजमीन सन ११४० मध्ये दान देऊन, दान दिलेली जमीन बल्लकुंदेचा प्रभू सोमरस याकडे व्यवस्थापणासाठी सोपवली होती, असे या शिलालेखाच्या वाचनातून प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे. येथे असलेल्या शिलालेखाचे आजपर्यंत कुठेच वाचन झाल्याचे आढळून आले नसल्याने शिलालेख इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेऊन व कर्नाटक हरीहर येथील कन्नड शिलालेख अभ्यासक प्रा. रविकुमार नवलगुंडा यांनी वाचन केले. यातून अनेक महत्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे.
येथे शिलालेख असल्याची माहिती स्थानिक लेखक, शिक्षक डॉ. नागेश पाटील यांच्याकडून गुडदे यांना मिळाली होती. दरम्यान, हा शिलालेख जुन्या कन्नड लिपी, भाषेत असून २५ ओळींचा आहे. लेख असलेली पाषाण शिळा कुंडाच्या पूर्व बाजूस आहे. शिळा ११४ सें.मी. लांब तर ६० सें.मी. रुंद आहे. शिळेवर वरील बाजूस सूर्य, चंद्र, तलवार, गाय-वासरू, शिवपिंड, पुजारी, हात जोडलेला भक्त असे शिल्पांकन आहे. त्याच्या खालील बाजूस सपाट भागावर लेख कोरलेला आहे.
शिलालेखात प्रारंभी वराहदेवतेची, शिवाची स्तुतीचे श्लोक संस्कृतमध्ये आहेत. त्यानंतर कल्याण चालुक्य राजा जगदेकमल्लदेव दुसरा याची राजप्रशस्ती आली आहेत. हा राजा गोदावरीच्या प्रदेशावरून राज्य करताना या राजाचे तिसरे राज्यवर्ष चालू असताना रौद्र संवत्सर वैशाख पौर्णिमा गुरुवार या तिथीला दान दिलेले आहे. मल्लर बिल्लय्या या व्यक्तीने बेडकी केरेय्या बल्लकुंद म्हणजेच बालकुंदाच्या पूर्वेला कुंडाजवळ मंदिर बांधून स्वयंभू सोमनाथ, नंदिकेश्वर, श्री केशवदेव, सप्तमातृका यांची प्रतिष्ठापना करून यांच्या भूपत्रे (बेलपत्र), नंदादीप, नैवैद्य यांसाठी २५ मत्तर शेती व तीर्थच्या पूर्वेला २ मत्तर मळा करमुक्त करून दान दिला. बल्लकुंदेचा प्रभू सोमरस याकडे याच्या व्यस्थापानासाठी सोपवल्याचे समजते.
कन्नड शिलालेखाचे वाचन डॉ. रविकुमार नवलगुंडा यांनी केले आहे. या कामात सचिन पवार सह स्थानिक डॉ. नागेश पाटील, प्रा. मारुती लोहार, सुनील बिराजदार, विजय पाटील, राम बुग्गे, गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.