लातूर जिल्ह्यातील ८६ आदर्श ग्रामसेवकांना एका आगाऊ वेतनवाढीचा बोनस!
By हरी मोकाशे | Published: October 9, 2023 07:07 PM2023-10-09T19:07:01+5:302023-10-09T19:07:19+5:30
लातूर जिल्हा परिषद : २००७ ते २०१६ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लाभ
लातूर : गाव पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना पूर्वी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्याबरोबरच एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र, २०१७ पासून ती बंद करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत आदर्श म्हणून सन्मानित झालेल्या ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे लक्ष लागून होते. अखेर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी जिल्ह्यातील ८६ आदर्श ग्रामसेवकांना वेतनवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दसरा-दिवाळीचा बोनसच मिळाला आहे.
ग्रामीण भागातील गावच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य करीत असतो. गावच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक ठरतो. ग्रामपंचायतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका आणि जिल्हा पातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते. सन २०१७ पूर्वीच्या अगोदरपर्यंत एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती.
सन २००६-०७ ते सन २०१५-१६ या कालावधीत जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या ८६ ग्रामसेवकांचा गौरव झाला होता. मात्र, एक आगाऊ वेतनवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे आदर्श ग्रामसेवकांतून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार आगाऊ वेतनवाढीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत.
सन २०११-१२ मध्ये आदर्श ग्रामसेवकांची निवडच नाही...
सन २०११-१२ मध्ये जिल्ह्यात आदर्श ग्रामसेवकांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे उत्कृष्ट कार्य करूनही ग्रामसेवकांच्या अपेक्षेवर पाणी फिरले होते. त्याचा मोठा फटका आता बसला आहे. ही निवड झाली असती तर जिल्ह्यातील जवळपास १० ग्रामसेवकांना आर्थिक लाभ झाला असता अशी चर्चा होत आहे.
मासिक वेतनात सरासरी दोन हजारांची वाढ...
एका आगाऊ वेतन वाढीच्या आदेशामुळे मासिक वेतनात सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे. तसेच त्याचे एरियस मिळणार आहे. शिवाय, सेवानिवृत्तीवेळी मोठा लाभ होणार आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अधिकाधिक उत्कृष्ट कार्य करावे.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.
ग्रामसेवकांनी अधिक उत्कृष्ट कार्य करावे...
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ८६ आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत आहे. ग्रामसेवकांनी करवसुलीसह रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे. शासन याेजना प्रभावीपणे राबवून गावच्या विकासासाठी अधिकाधिक उत्कृष्ट कार्य करावे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्याचा लाभ होईल.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.
वेतनात सरासरी ३ टक्के वाढ...
तालुका - ग्रामसेवक संख्या
औसा - ९
देवणी - १०
रेणापूर - ७
निलंगा - ९
शिरुर अनं. - ८
चाकूर - १०
अहमदपूर - ९
उदगीर - ९
लातूर - ८
जळकोट - ७
एकूण - ८६