मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक
By हणमंत गायकवाड | Updated: June 11, 2024 18:38 IST2024-06-11T18:38:08+5:302024-06-11T18:38:50+5:30
मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक
लातूर : लातूर शहरासह कळम, केज, धारूर व अंबाजोगाई या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पात दोन सेंटिमीटरने पाण्याची वाढ झाली आहे. ०.२५९ दलघमी पाण्याची आवक मांजरा प्रकल्पात झाली आहे. यामुळे लातूरसह, केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृतसाठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मृग नक्षत्रात हा मोठा पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये दोन सेंटिमीटरने पाणी पातळीत वाढ झाली असून ०.२५९ दलघमी नव्या पाण्याची आवक झाली आहे. नव्याने आवक झालेले पाणी किमान दहा दिवस करू शकते इतके आले आहे. या पावसाळ्यातला हा शुभसंकेत असून धरण क्षेत्रामध्ये आणखीन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. १४ जूनपर्यंत परिसरात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने यंदा शेतीलाही पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांच्या पल्लवित झाल्या आहेत. सध्या धरणामध्ये ४४ दलघमी मृत पाणीसाठा असून त्यात आता ०.२५९ दलघमी नव्या पाण्याची आवक झाली आहे.