९ तासांत रेणा प्रकल्पात १४ टक्के जलसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:47+5:302021-09-02T04:43:47+5:30
सोमवारपासून सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. रेणा प्रकल्प क्षेत्रात ...
सोमवारपासून सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. रेणा प्रकल्प क्षेत्रात जरी पाऊस कमी असला तरी अंबाजोगाई व परळी तालुक्यातील दोन धरण शंभर टक्के भरल्याने अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे रेणा प्रकल्पात केवळ ९ तासांत १४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
सोमवारी दिवसभर या प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा होता. रात्री पावसामुळे प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ६ वा. पासून पाण्याचा ओघ वाढला. दुपारी ३ वा. पर्यंत प्रकल्पात १४ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण २९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिवंत पाणीसाठा ५.९९ दलघमी व एकूण पाणीसाठा ७.१२० दलघमी झाला आहे.
सकाळपासून वेग वाढला...
अंबाजोगाई व परळी तालुक्यातील मुरंबी आणि जोगाईवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग होऊन हे पाणी रेणा प्रकल्पात येत आहे. रात्री १२ वा. पासून रेणा धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी ६ वा. पासून पाण्याचा वेग वाढला. दुपारी २.३० वा. पर्यंत जिवंत पाणीसाठा ५.९९ दलघमी तर एकूण पाणीसाठा ७.१२० दलघमी असा झाला आहे, असे रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.
दोन मंडळात अतिवृष्टी...
रेणापूर तालुक्यात गत २४ तासांत सरासरी ५९.९ मिमी पाऊस झाला आहे. रेणापूर मंडळात ३५, पोहरेगाव- ५२, पानगाव- ८४, कारेपूर- ६५.३ आणि पळशी मंडळात ६३ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.