धाडसी चोरी! डोळ्यांत मिरचीची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख पळविले
By हरी मोकाशे | Published: February 24, 2023 06:34 PM2023-02-24T18:34:11+5:302023-02-24T18:35:34+5:30
या धाडसी व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत
देवणी (जि. लातूर) : नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री शहरातील एका व्यापाऱ्याने दुकान बंद करुन दिवसभरात जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये घेऊन पायी घराकडे जात होते. तेव्हा अज्ञात दोघांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून सदरील रक्कम पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात दोघा अज्ञाताविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवणी पोलिसांनी सांगितले, येथील बसस्थानकासमोर उमाकांत जगदीश जीवने (रा. देवणी) यांचे कापडाचे दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ९ वा. च्या सुमारास दुकान बंद केले. तत्पूर्वी दिवसभर व्यवहारात जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये एकत्र करुन बॅगेत ठेवले. त्यानंतर ते पैशाची बॅग घेऊन बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या घराकडे जात होते. बस स्थानकाची संरक्षक भिंत ओलांडून पलिकडील अरुंद रस्त्यावर पोहोचले असता एका अज्ञात तरुणाने त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून त्यांच्या हातातील ९ लाख ५ हजारांची बॅग हिसकावली आणि पळ काढला.
दरम्यान, त्या अज्ञात चोरट्याचा साथीदार बाजूच्या रस्त्यावर दुचाकी चालू करुन थांबला होता. बॅग घेऊन आलेल्यास विनाविलंब दुचाकीवर बसवून दोघेही मुख्य रस्त्यावरुन पसार झाले. याप्रकरणी उमाकांत जीवने यांच्या फिर्यादीवरून देवणी ठाण्यात दोघा अज्ञाताविरुध्द शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे करीत आहेत.
तपासासाठी तीन पथके...
या धाडसी व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. निलंग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासासाठी सूचना केल्या. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
संशयित ठिकाणांची पाहणी...
चोरट्यांच्या शोधासाठी शुक्रवारी दिवसभर शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्यात आली. तसेच संशयित ठिकाण व व्यक्तींची झाडाझडती करण्यात आली. दिवसभर पोलीस उपनिरीक्षक नारायण डपटवाड, पोहेकॉ. विनायक कांबळे, गणेश बुजारे, सुग्रीव कोंडामंगले, सय्यद शौकत, अभिजीत डोईजड, नरेश उस्तुरगे, देविदास किवडे हे तपास करीत होते.