निलंगा तालुक्यातील ९ गावांनी ‘त्या’ रात्री जागून काढल्या..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 06:28 AM2022-09-24T06:28:21+5:302022-09-24T06:29:10+5:30
भूकंप : भूगर्भातील आवाजाने ग्रामस्थांची झाेपच उडली
राजकुमार जोंधळे / लातूर
लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरीसह उस्तुरी, बडूर, हरिजवळगा, भुतमुगळी, बोळेगाव, शिवणी कोतल, हाडगा, वडगाव या नऊ गावांना ६ सप्टेंबर, ८ तसेच १२, १५ आणि २३ सप्टेंबर रोजी भूगर्भातून आवाज गावांना जाणवले. ज्या दिवशी गावांमध्ये भूगर्भातील आवाज ऐकू आले, त्या दिवशी अनेकांनी जमीन हादरली, अशी माहितीही दिली होती. ३० सप्टेंबर १९९३ च्या कटू आठवणी जिल्ह्याला आहेत. त्यामुळे भूगर्भातून आवाज जाणवल्या दिवशी गावकऱ्यांनी ती रात्री जागून काढली.
१२, १५ व २३ सप्टेंबर रोजीच्या धक्क्यांची नोंद...
भूगर्भातून आवाज आल्याच्या घटना ६ ते २३ सप्टेंबरदरम्यान पाचवेळा घडल्या असल्या तरी भूमापन केंद्रात १२, १५ व २३ सप्टेंबरच्या धक्क्यांची नोंद झाली. तिन्ही नोंदी १.३ आणि २ रिश्टर स्केल अशा सौम्य धक्क्यांच्या आहेत.
भूगर्भातील आवाजाची कारणे...
१) भूगर्भात हवेची पोकळी निर्माण होऊन आवाज येऊ शकतो. तसेच जमिनीतील पाण्याचा अतिउपसा झाल्यामुळेही आवाज येण्याचे कारण असू शकते, याशिवाय हासोरी हे गाव भूकंपाच्या किल्लारी पट्ट्यात असल्यानेही आवाज येत असावा, असा अंदाज दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र व हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी प्रारंभी व्यक्त केला होता.
२) निलंगा तालुक्यातील हासोरीसह परिसरातील गावांत गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातून आवाज येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावांना नवी दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभाग व हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. गावकऱ्यांशी चर्चा केली. सध्या पावसाचे दिवस आहेत. जमिनीत पाणी मुरते. पाणी जमिनीत गेल्यानंतर हवेचा दाब वाढला जातो. त्यामुळे जमिनीतून आवाज येतो.
३) विशेष म्हणजे हासोरी परिसरातील जमीन ही काळी माती असलेली आहे. अशा ठिकाणी आवाज अधिकचा असतो. असेही पथकाचे मत आहे. शिवाय तेरणा नदीच्या परिसरात खालच्या बाजूला भूगर्भात खडक आहे. त्याच्याही हालचालीने आवाज येत असेल, अशा अनेक शक्यता या तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
४) तेरणा नदीपात्रात मायनर फॉल्टलाइन आहे. यावरूनही हे धक्के असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तशी नोंदच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सातही केंद्रांवर झालेली आहे. नांदेड, परभणी आणि कर्नाटक राज्याच्या सीमा परिसरात भूकंप मापक यंत्र बसविले आहेत. त्यावरही भूकंप असल्याची नोंद झाली आहे. प्राप्त स्थितीत झालेल्या तिन्ही धक्क्यांची नोंद सौम्य स्वरूपाची आहे, ते अधूनमधून होत असल्याचे निरीक्षण आहे.