जळकोटातील ९३३ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:44+5:302021-04-22T04:19:44+5:30
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे धास्ती वाढली होती. जळकोट शहरात ९७ तर एकुर्का गावात ८२ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ...
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे धास्ती वाढली होती. जळकोट शहरात ९७ तर एकुर्का गावात ८२ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. धामणगावात ३५, शिंदगीत ४८, लाळीत २४ कोरोना बाधित ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, या गावांत आरोग्य विभागाच्या वतीने प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संगर्स रोखण्यासाठी काही भाग सीलही करण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती व उपाययोजना महत्त्वाच्या असल्याने आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सुरुवात केली. तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयात कोविड चाचण्या घेण्यात येत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांना पायबंद बसावा म्हणून पोलीस प्रशासनाची करडी नरज आहे. तसेच दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी घरी थांबणेच योग्य आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. नेहमी हात स्वच्छ धुवावेत. शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
गृहविलगीकरणात २९७ जण...
तालुक्यातील बाधितांची नोंद १ हजार ३२७ वर पोहोचली आहे. त्यातील ९३३ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ३७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये २९७ जण आहेत. गंभीर आजारी असलेल्या ४० जणांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये २९ जण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.