जिल्ह्यात हजार मुलांमागे ९४५ मुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:06+5:302020-12-22T04:19:06+5:30
२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, ...
२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, २०१९ मध्ये ९३८ प्रमाण राहिले आहे. तर आता २०२० मध्ये हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण आहे. मुली जन्माचा दर वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गावनिहाय गरोदर मातांची नोंदणी केली जात असून, प्रसुतीपर्यंत देखरेख केली जाते. बाळाच्या जन्मानंतरही पुढील एक वर्ष सकस आहार आणि उपचाराची काळजी घेतली जात असल्याने बाल मृत्यूचे प्रमाण तर कमी झालेच आहे. शिवाय, मुलींच्या जन्मदरातही वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी हजार मुलांमागे ८०० ते ९०० पर्यंत मुलींचे प्रमाण होते. परंतु, आता त्यात चांगली वाढ झाली असून, मुला-मुलींचा जन्मदर समतोल करण्याकडे आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत लातूर जिल्ह्यात १२ हजार २८६ बाळांना मातांनी जन्म दिला. यात ६ हजार ४३४ मुले तर ५ हजार ८५२ मुलींचा समावेश आहे. या आठ महिन्यामध्ये जन्मलेल्या मुला-मुलींचे प्रमाण तालुकानिहाय असे आहे.
अहमदपूर हजार मुलांमागे ९६०, औसा ७८१, चाकूर ९३७, देवणी ६८७, जळकोट ८१६, लातूर ९२८, निलंगा ८३४, रेणापूर १०८९, शिरूर अनंतपाळ ९२५, उदगीर ९०४ तर जिल्ह्यात सरासरी ९०९ चे प्रमाण आहे. सदरचे प्रमाण एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंतचे आहे. २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
वर्षभर मोफत लसीकरण
मातृ सुरक्षा, सुरक्षित बाळंतपण, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना आदी वेगवेगळ्या योजना आरोग्य विभागाच्या वतीने बाळ व बाळंतिणीच्या आरोग्याच्या अनुषंगाने राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत बाळाला मोफत लसीकरण व उपचार केले जातात.
महिलांसाठी आरोग्यसेवा
गरोदर मातांच्या आरोग्याबाबतही काळजी घेतली जाते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत बाळंतपण झाल्यास ७०० रुपये मातांना दिले जातात. तर अन्य योजनेमध्ये ५ हजाराची तरतूद आहे. सकस आहार आणि उपचारासाठी विशेष काळजी काळजी घेतली जाते.
मुला-मुलींचे जन्मदराचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. गावस्तरावर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत गरोदर मातांची नोंदणी करून सकस आहार आणि उपचाराबाबत लक्ष दिले जाते. प्रसुतीपर्यंत आणि त्यानंतरही खबरदारी घेतली जाते.
- डाॅ. गंगाधर परगे,
जिल्हा आरोग्याधिकारी,