विनाकारण फिरणाऱ्या ९५ जणांना दिला झटका! दाेन दिवसांत ९७ हजारांचा दंड...
By राजकुमार जोंधळे | Published: March 14, 2023 08:01 PM2023-03-14T20:01:50+5:302023-03-14T20:01:56+5:30
लातूर शहरातील क्लासेस परिसरासह सिग्नल कॅम्प आणि उद्याेग भवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
लातूर : शहरातील उद्याेगभवन, सिग्नल कॅम्प आणि क्लासेस परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक पाेलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात ९५ वाहनधारकांवर खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर ९७ हजारांचा दंड केला आहे.
लातूर शहरातील क्लासेस परिसरासह सिग्नल कॅम्प आणि उद्याेग भवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास एक हजारांवर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबराेबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माेटार वाहन कायद्यानुसार ७५० वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर तब्बल ७ लाखांवर दंड करण्यात आला आहे. असभ्य वर्तन केल्याप्रकरणी १५० जणांविराेधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याविराेधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर सार्वजिनक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ३५ वाहनधारकांना दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांना ४० हजारांचा दंड करण्यात आला आहे.
गत दाेन दिवसांमध्ये ९५ जणांवर कारवाई...
साेमवार आणि मंगळवारी पाेलिसांनी ९५ जणांवर खटले दाखल केले आहेत. त्यांच्यावर तब्बल ९७ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. विनाकारण फिरणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, आदींसह इतर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
तंबाखूविराेधी कायदा; ६० जणांवर गुन्हे दाखल
उद्याेग भवन, सिग्नल कॅम्प आणि क्लासेसच्या परिसरात तंबाखूविराेधी कायद्यानुसार ६० जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हे अनेकांना अंगलट आले आहे.