सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज; शानदार दिक्षांत सोहळ्यात कवायती ठरल्या लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:38 PM2022-05-30T19:38:01+5:302022-05-30T19:38:19+5:30
८० महिला जवानांचा समावेश : पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला सोहळा
लातूर : येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील ९६२ जवानांचा शानदार दिक्षांत सोहळा सोमवारी सकाळी पार पडला. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल, प्रशिक्षण महानिदेशालय कार्यालयाचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रशिक्षण पुर्ण झालेल्या जवानांना कमांडट आर.के. सिंग यांनी शपथ दिली. त्यानंतर पथसंचलन पार पडले.
यावेळी जवानांनी मल्लखांब, कराटे, आपत्कालीन स्थितीतील उपाययोजनाचे प्रात्यक्षिक दाखविले. ४४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ९६२ जवान देशसेवेत दाखल झाले असून, यामध्ये ८० महिलांचा समावेश आहे. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीव कुमार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, कमाडंट आर.के. सिंग, पी.के.सुधा, रणवीर सिंग, डी.व्ही.मारोती, पी.के. घोष यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीव कुमार म्हणाले, लातूर सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ७ हजार ५९६ जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ४४ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
याप्रसंगी प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे नारायण प्रधान, संदेश जाधव, पल्लवी कुमारी, सुजित कुमार पांडा, मुकेश किंडो, कनकप्पा, पुष्पेंद्र कुमार, विक्रम सिंग कविया, व्यंकटेश कुरी यांचा गौरव करण्यात आला. परेडचे नेतृत्व नारायण चामे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल कोरे व डॉ. निकिता नायडू यांनी मानले.
जवान कर्तव्य, सेवेचे पालन करतील...
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण महानिदेशालयाचे महानिरीक्षक राकेश कुमार यादव म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या सैन्यदलात ९६२ जवान सहभागी होत आहेत. खडतर प्रशिक्षणानंतर हे जवान देशसेवेसाठी सज्ज झाले असून, आतंकवाद, नक्षलवाद संपविण्यासाठी कार्यरत राहतील. आपल्या सेवेच्या काळात जवान कर्तव्य व उद्देश सेवेचे पालन करतील, असेही ते म्हणाले.
लक्षवेधी कवायतीचे सादरीकरण...
सीआरपीएफच्या दिक्षांत समारोहात जवानांनी कराटे, मल्लखांब, काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतूक केले. दिक्षांत समारोहासाठी विविध राज्यातून जवानांचे कुटूंबिय उपस्थित होते. यावेळी महिलांच्या टीमनेही प्रात्यक्षिक सादर केले.