शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

By हरी मोकाशे | Published: January 3, 2024 07:02 PM2024-01-03T19:02:36+5:302024-01-03T19:03:09+5:30

आवक घटल्यानंतर दरवाढ होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या किमान दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

A big hit to farmers, further fall in the price of soybeans! | शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डीओसीची मागणी घटल्याने त्याचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला आहे. किमान भाव जवळपास २०० रुपयांनी आणखीन उतरला आहे. बुधवारी ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गत खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचा साडेचार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होता. सुरुवातीस पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन चांगले उगवले होते. पीक बहरत असताना ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिला. त्यामुळे उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या राशी करून विक्री करण्यास सुरुवात केली. तेव्हा सोयाबीन दरात वाढ झाली नव्हती,
दरम्यान दिवाळी सणाच्या कालावधीत आवक वाढली आणि भावही वाढला. त्यामुळे आगामी काळात आणखीन दर वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली. मात्र, दीपावली झाल्यानंतर पुन्हा दर उतरण्यास सुरुवात झाली. कमाल भाव ५ हजार २०० रुपयांपर्यंत होता. आता ४ हजार ८०३ रुपयांवर आला आहे.

सर्वसाधारण दर स्थिर...
गेल्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनचे सर्वसाधारण दर जवळपास स्थिर आहेत. बुधवारी सर्वसाधारण भाव ४ हजार ७२० रुपये असा मिळाला. दरम्यान, बाजार समितीतील आवक दिवसेंदिवस घटत आहे. सध्या ७ हजार ७६३ क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक घटल्यानंतर दरवाढ होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या किमान दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

किमान भाव २०० रुपयांनी उतरले...
दिनांक - आवक - कमाल- किमान - सर्वसाधारण

२५ डिसें. - ७१०८ - ४८१६ - ४७२६ - ४७७५
२६ रोजी - ९०४७ - ४८०० - ४६०० - ४७५०
२८ रोजी - ६४०६ - ४८०२ - ४६०० - ४७७०
३० रोजी - ५५६२ - ४८६० - ४६११ - ४७७०
२ जाने. - ११८४७ - ४८५३ - ४६०० - ४७५०
३ रोजी - ७७६३ - ४८०३ - ४४०० - ४७२०

शेतमाल तारणचा लाभ घ्यावा...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सोयाबीनचे दर अवलंबून असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन डीओसीला मागणी घटली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धोरणामुळे विदेशातील पामतेलाची आयात वाढली आहे. परिणामी, देशातील खाद्यतेलाची मागणी घटली आहे. त्यामुळे सोयाबीनची मागणी कमी झाल्याने किमान दरात आणखीन घसरण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत असून त्याचा गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

Web Title: A big hit to farmers, further fall in the price of soybeans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.