लातुरात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; पिस्तुलांसह बिहारी गँगमधील दोघे अटकेत
By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2023 04:29 PM2023-09-29T16:29:02+5:302023-09-29T16:34:22+5:30
लातूरात सणासुदीत बँक, सराफा दुकानावर मोठा दरोड्याची तयारी
लातूर : शहरासह जिल्ह्यात बँक, सराफा दुकान, गोल्ड लोन देणाऱ्या फायनान्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी दोघांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली असून, त्याच्याकडून चार पिस्टल, एक गावठी कट्टा, ५९ जिवंत काडतुसे, दुचाकी, बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील तिघे जन पळून गेले आहेत.
चाकूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना खबऱ्याने माहिती दिली. लातूर जिल्ह्यात पोलीस गणेश उत्सव, विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. याच काळात संधी साधून काही मोठा दरोडा टाकणयाच्या तयारीत सराईत गुन्हेगार आहेत. ते लातूर-मुरुड रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँक ते शोरूम दरम्यान संशयितरित्या दुचाकीवरून फिरत आहेत. त्यावरून पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी माहितीची खातरजमा करून पोलीस पथक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना छापा मारून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचपैकी दोघांना पकडण्यात आले. तिघे दोन बॅग जागेवरच टाकून पळून गेले.
ताब्यातील दोघांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे विकासकुमार पिता श्रीगोपाल शरण गुप्ता (२७, रा. तिउरी ठाणा, मानपूर जि. नालंदा, बिहार), अमितकुमार रवींद्रसिंग यादव (२२ रा. फतवा, जि. पाटणा,बिहार) यांना अटक केली. तर फरार झालेल्यात शिवकुमार उर्फ संजीव कुमार यादव (३० रा. हाजीपुरा जि. वैशाली, बिहार), लकीकुमार राजकुमार प्रधान (२८, रा.पश्चिम सारंगपूर ,पश्चिम बिहार, दिल्ली), छोटू उर्फ ननकी यादव, (२९, रा. वैशाली, बिहार) यांचा समावेश आहे. सोबतच्या आरोपींनी जागेवरच टाकून दिलेल्या बॅगची झडती घेतली असता, त्यात चार पिस्टल, एक गावठीकट्टा, ५९ जिवंत काडतूस, चार्जर, चार वेगवेगळ्या कंपन्याचे सीम कार्ड,बनावट आधार कार्ड, लायसन, दुचाकी (एम.एच. २८ बी. ई.६७५३ ) लोखंडी, प्लॅस्टीकची मुठ असेलेले तीन चाकूसह इतर साहित्य असा ३ लाख ५६ हजार २३० रुपयाचा मुद्देमाल मोबाईल ग्रामर, दुचाकी असे साहित्य जप्त केले आहे.
त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, पाटणा येथील कारागृहातील गुन्हेगार सुबोधसिंग (रा. चंडी, जि. नालंदा, बिहार) याच्या संपर्कात असून त्यांने,आम्ही दोघे आणि आमच्यासोबत असलेले बिहारमधील तिघांनी कर्नाटकातील आळंद, महाराष्ट्रातील लातूर येथील एखाद्या बँकेवर, सराफ दुकानावर, गोल्ड फायनान्सवर दरोडा टाकण्याचा कट रचला होता. त्यानुसार दरोडा टाकण्यासाठी थांबल्याचे कबूल केले. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि. माणिक डोके हे करत आहेत.
लातुरात मोठा दरोडा टाकण्याचा होता प्लॅन...
लातुरात मोठा दरोड्याच्या गुन्हा तयारीत असलेल्याकडून चार पिस्टल, एक गावठी कट्टा, तब्बल ५९ जिवंत काडतुस, बनावट आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, दरोड्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य हॅन्डग्लोज, मास्क चिकटपट्टी, लोखंडी रॉड, कटर, कात्रीसह आढळून आले.
या पोलिस पथकाने केली कारवाई...
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शसोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, अंमलदार खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, संपत फड, मनोज खोसे, प्रदीप चोपणे,रामहरी भोसले यांच्या पथकाने केली आहे.