ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ
By हरी मोकाशे | Published: July 27, 2023 06:38 PM2023-07-27T18:38:11+5:302023-07-27T19:45:04+5:30
अवैध दारुविक्रेते तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना दणका
बेलकुंड : गावातील अवैध दारूविक्री बंद व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने अखेर औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथील गावकऱ्यांनी धाडसी निर्णय घेतला आहे. अवैध दारुविक्रेत्यास तसेच त्यांना मदत करणाऱ्यास यापुढे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष बुधवारी घेतला.
तीन हजार लोकसंख्या असलेल्या औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे काही वर्षांपासून अवैध दारुविक्री वाढली आहे. त्यामुळे गावात तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे घरोघरी भांडणे वाढत असून, काही जणांचे संसारही उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील अवैध दारुविक्री बंद करण्यात यावी म्हणून सातत्याने पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, दारुबंदी तात्पुरती बंद होत असे.
काही दिवस उलटले की पुन्हा अवैध दारुविक्री सुरु होत असते. त्यामुळे गावकऱ्यांनी बुधवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी केली. अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ही कारवाई झाल्यानंतर त्यांना जामीन करण्यात येऊ नये. तसेच कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ देण्यात येऊ नये. शिवाय, रेशन दुकानातून धान्यही देऊ नये, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच रमा गौतम कांबळे, उपसरपंच अर्जुन घाडगे- पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
अवैध दारुविक्रीला चाप...
गावात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारूविक्री होत आहे. ती बंद व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. परंतु, अवैध दारूविक्रेत्यास काहीजण मदत करीत असल्याने अडचण होत होती. अखेर ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितच गावातील अवैध दारुविक्री बंद होईल. तसेच गावातील तंट्यांचे प्रमाण कमी होईल.
- अर्जुन घाडगे- पाटील, उपसरपंच, तावशी (ताड).