अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक, पशूवैद्यकीय अधिकारी ठार
By हरी मोकाशे | Published: December 19, 2022 06:38 PM2022-12-19T18:38:46+5:302022-12-19T18:39:13+5:30
अहमदपूरहून दुचाकीवरुन रोकडा सावरगावकडे निघाले असता काजळ हिप्परगा गावाजवळ झाला अपघात
किनगाव (लातूर) : दुचाकीवरुन एक पशुवैद्यकीय अधिकारी जात असताना अचानकपणे रस्त्यात म्हैस आली. त्यामुळे दुचाकीची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा गावाजवळ सोमवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास घडली.
डॉ. नामदेव रामकिशन भिकाने (३८, रा. सोनखेड- मानखेड, ता. अहमदपूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. डॉ. नामदेव भिकाने हे अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते अहमदपूर येथे वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी ते अहमदपूरहून दुचाकीवरुन रोकडा सावरगावकडे निघाले होते. तेव्हा काजळ हिप्परगा गावाजवळील पुलाजवळ रस्त्यावर अचानकपणे म्हैस आली. त्यामुळे त्यांची म्हशीला जोराची धडक बसली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर सोनखेड- मानखेड येथे सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.