गावात दिवसभरातून येते एकाचवेळी बस; विद्यार्थ्यांना टपावरुन करावा लागतोय जीवघेणा प्रवास
By हरी मोकाशे | Published: September 19, 2022 08:20 PM2022-09-19T20:20:50+5:302022-09-19T20:22:00+5:30
लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे.
लातूर : अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. व परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिरुर ताजबंद, अहमदपूरला दररोज जावे लागते. परंतु, या गावास सध्या एकच एसटी बस असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन बसच्या टपावरुन प्रवास करावा लागत आहे.
अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. छोटेसे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा असली तरी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिरुर ताजबंद अथवा अहमदपूरला जावे लागते. तसेच परिसरातील शिवणखेड, मोरतळवाडी, सय्यदपूर, वायगाव येथील विद्यार्थ्यांनाही माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शिरुर, अहमदपूरला जावे लागते. कोविडच्या प्रादुर्भावापूर्वी शिरुर ताजबंद ते शिवणखेड अशी दर तास बस हाेती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची सोय होत होती.
लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे. उर्वरित बस बंद केल्या. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नागरिकांना विविध कामांसाठी शिरुर, अहमदपूरला ये- जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. बहुतांशवेळा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांना दररोज खाजगी वाहनाने शाळेसाठी जाणे परवडत नाही. त्यामुळे गावात बस आली की बसमध्ये चढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, बसमध्ये उभारण्यासाठीही जागा नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन टपावर बसून प्रवास करावा लागत आहे.
तात्काळ बस सुरु करावी...
एकच बस असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. त्यामुळे गावासाठी किमान आणखीन एक बस सुरु करावी. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रसिंह बयास यांनी सांगितले. यासंदर्भात तहसीलदार, आगारप्रमुखांना निवेदनही दिले आहे. दरम्यान, अहमदपूरचे आगारप्रमुख शंकर सोनवणे म्हणाले, या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करुन विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यात येईल.