पार्किंगमध्ये थांबविलेल्या कारने अचानक घेतला पेट; जाग्यावरच कार झाली खाक...
By राजकुमार जोंधळे | Published: January 10, 2023 07:29 PM2023-01-10T19:29:03+5:302023-01-10T19:29:19+5:30
अचानक पार्किंगमध्ये थांबलेल्या कारमधून अचानक धूर निघायला प्रारंभ झाला.
जळकोट (जि. लातूर) : पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना जळकाेट येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुल परिसरात साेमवारी घडली. या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही. वाहनाने पेट कशामुळे घेतला, हे कारण मात्र समाेर आले नाही.
जळकाेट येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलात डीटीएडच्या परीक्षा सुरू हाेत आहेत. हॉल तिकीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात गर्दी आहे. अचानक पार्किंगमध्ये थांबलेल्या कारमधून अचानक धूर निघायला प्रारंभ झाला. परिणामी, सुरक्षा रक्षकाने काळजी घेत हे वाहन काेणाचे आहे? त्या वाहनातून धूर निघत आहे. वाहन पेट घेईल, अशी शक्यता वर्तविली हाेती. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व उपस्थित संस्थाचालक प्राचार्य, प्राध्यापक, सेवक आणि इतरांनी वाहनाची आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न...
फायर फायटरच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने कारच्या काचा फोडून वाहन ढकलत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काढले. लगतच्या शेतात थांबविण्यात आले. आग आटाेक्यात आणण्यासाठी सुरक्षा रक्षक कृष्णा त्रिपती, गोपीनाथ नागरगोजे, सरपंच राहुल सूर्यवंशी, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, संस्थाचालक चंदन पाटील नागरगोजे यांनी प्रयत्न केले.