मतमोजणी कक्षात गोंधळ घालणाऱ्या माजीमंत्री विनायकराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
By संदीप शिंदे | Published: May 2, 2023 06:11 PM2023-05-02T18:11:22+5:302023-05-02T18:12:42+5:30
मतमोजणी कक्षात प्रवेश करून तिघांनी कर्मचाऱ्यांना केली धक्काबुकी
अहमदपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी मतमोजणी सुरू असताना मतमोजणी कक्षात जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर बाजार समिती निवडणुकीसाठी ३० एप्रिल रोजी शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी आठ ते चार या कालावधीत मतदान झाले. सहायक निबंधक वसंत घुले हे निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांच्या उपस्थितीत काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुपारी पाचच्या दरम्यान मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. मतमोजणी कक्षामध्ये अधिकृत कर्मचारी, नोंदणीकृत प्रतिनिधी व नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी यांनाच प्रवेश देण्यात आला होता. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मतमोजणी सुरळीत पार पडत असताना माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी गुट्टे, कल्याण बदने व अनोळखी एका व्यक्तीने मतमोजणी कक्षात प्रवेश केला.
त्यांनी सहायक निबंधक वसंत घुले व मतमोजणी करणारे कर्मचारी किलचे यांना दमदाटीसह धक्काबुक्की करून त्या ठिकाणी असलेल्या टेबलास लाथ मारली. याप्रकरणी सहायक निबंधक सहकारी संस्था तथा तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घुले यांच्या फिर्यादीवरून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी गुट्टे, कल्याण बदने व इतर एक अशा चार जणांविरोधात शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व दमदाटी करणे या संदर्भात भादंवि ३५३, ३३२, १७१ (एफ), ११४, ३४ या कलमानुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल धुरपडे करीत आहेत.