लातुरात दरोडखोर अन पोलिसांची झटापट; थरारक पाठलागानंतर ५ जण अटकेत
By राजकुमार जोंधळे | Published: May 15, 2023 04:06 PM2023-05-15T16:06:32+5:302023-05-15T16:06:53+5:30
लातुरात शिक्षक अन पोलिसाच्या घरावर भल्या पहाटे धाडसी दरोडा !
लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक शिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. यावेळी पोलिस कर्मचारी आणि दरोडेखोरांमध्ये झटापट झाली. दरम्यान, दरोडेखोरांनी पोलिस कर्मचाऱ्यास काठीने मारहाण केली असून, यात हात फ्राक्चर झाला आहे. आंबाजोगाईच्या दिशेने पळून जाणाऱ्या सहापैकी पाच जणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात शिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर नगर आणि बीड जिल्ह्यातील सहा दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी भल्या पहाटे धाडसी दरोडा टाकला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर काठीने मारहाण करण्यात आली असून, यात त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. दरोड्याच्या घटनेनंतर आंबाजोगाईच्या दिशेने दरोडेखोर पळून जात होते. याची माहिती पोलिसांना मिळाली अन पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. रेणापूरच्या पुढे एक शेतातील उसाच्या फडामध्ये दडी मारलेल्या सहापैकी पाच दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हा थरारक 'पकडपकडी'चा खेळ पहाटेच्या सुमारास सुरु होता. एक दरोडेखोर जखमी असल्याने तो ऊसाच्या फडतच लपून बसला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. त्याच्याही मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरूच आहे. दरोड्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास एकूण दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अटकेतील दरोडेखोरांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरोडेखोरांच्या अटकेसाठी पोलिस पथके तैनात केली.
चार तास चालले कोंम्बिग ऑपरेशन...
दरोडा पडल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले. दरम्यान, दरोडेखोर आंबाजोगाईच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
वेगवेगळ्या मार्गावर पोलिसांची नाकाबंदी..
दरोड्याच्या घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. क्षणाक्षणाला मिळणाऱ्या माहितीनंतर पोलिसांनी आंबाजोगाई मार्गाच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. जवळपास चार तासाच्या प्रयत्नानंतर सहापैकी पाच दरोडेखोरांना पकडण्यात यश आले.
दरोडेखोरांचा राज्यभरात धुमाकूळ...
अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील हे दरोडेखोर असून, ते सराईत, अट्टल आहेत. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात धाडसी दरोडे, जबरी चोऱ्या आणि नागरिकांवर प्राणघातक हल्ले असे गंभीर गुन्हे केले आहेत. दरोडेखोरांची टोळी पोलिस रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.