लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा
By हरी मोकाशे | Published: January 4, 2024 05:35 PM2024-01-04T17:35:27+5:302024-01-04T17:35:57+5:30
शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत.
लातूर : वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक, शारीरिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना आरोग्यविषक संवाद साधता यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दर गुरुवारी आरोग्य सन्मान मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांची मोफत आरोेग्य तपासणी करुन औषधोपचार, मार्गदर्शन केले जाणार आहे.
सध्या समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वाढत्या वयानुसार ज्येष्ठांमध्ये व्याधी वाढतात. ग्रामीण भागातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळाल्याने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सन्मान मेळावा, शिबीर घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या मेळाव्यासाठी प्रत्येक शिबिराच्या पहिल्या दिवशी शाळा, ग्रामपंचायत, आशा यांच्यामार्फत जाणीवजागृती केली जाणार आहे. शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत.
७५ वर्षे पूर्ण होणाऱ्या आजी- आजोबांचा सत्कार...
दर गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात हे शिबीर होणार आहे. यात डोळे, कान- नाक- घसा, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग याबाबतच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. ज्येष्ठांना जास्तीत जास्त बोलते करुन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ७५ वर्षे पूर्ण होणाऱ्या आजी- आजोबांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच कोणतेही व्यसन नसलेल्या आजी- आजाेबांचा सत्कार करण्यात येणार आहे.
योजनांचीही माहिती दिली जाणार...
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषक समस्या सोडविण्याबरोबरच शासनाच्या इतर सामाजिक योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेबरोबर योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हास्तरीय मोहिमेचे पाखरसांगवीत उद्घाटन...
आरोग्य सन्मान मेळाव्याच्या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन पाखरसांगवी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात गुरुवारी झाले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा परिषदेेचे प्रभारी सीईओ असलम तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद बिलापट्टे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा वाघमोड आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसेच योगाचे प्रात्यक्षिक झाले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या आजी- आजोबांचा सत्कार करण्यात आला.