उदगिरात अवैध गर्भपाताचा भंडाफाेड; रुग्णालयावर पाेलिस, डाॅक्टरांचा छापा

By राजकुमार जोंधळे | Published: September 22, 2024 09:43 PM2024-09-22T21:43:22+5:302024-09-22T21:43:43+5:30

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार फुलारी यांनी सांगितले.

A crackdown on illegal abortions in Udgir; Police, doctors raid the hospital | उदगिरात अवैध गर्भपाताचा भंडाफाेड; रुग्णालयावर पाेलिस, डाॅक्टरांचा छापा

उदगिरात अवैध गर्भपाताचा भंडाफाेड; रुग्णालयावर पाेलिस, डाॅक्टरांचा छापा

राजकुमार जाेंधळे / उदगीर (जि. लातूर) : एका रुग्णालयात अवैध गर्भपात करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस आणि डाॅक्टरांच्या पथकाने रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा टाकून भंडाफाेड केला. ही घटना उदगीर शहरातील बनशेळकी राेडवरील एका रुगणालयात घडली. यावेळी गर्भपात करणाऱ्या डॉक्टराला ताब्यात घेतले आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीरमधील बनशेळकी रोडवर असलेल्या चौकात अफिया क्लिनिकमध्ये एका महिलेचा गर्भपात सुरू असल्याचा निनावी दूरध्वनी उदगीर सामान्य रुग्णालयातील अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांना आला. घटनेची माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती वाडीकर, रुग्णालयाचे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिता मेकले आणि त्यांचे कर्मचारी यांना साेबत घेत रुग्णालयाकडे निघाले. याची माहिती उदगीर शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना देण्यात आली. पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकाने या रुग्णालयावर रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा मारला. मिळालेल्या माहितीनुसार तेथे एका साडेतीन ते चार महिने गरोदर असलेल्या मातेचा गर्भपात केला जात असल्याचे डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले. त्यांनी तातडीने येथील डॉक्टरांना कागदपत्राची मागणी करत चौकशी केली असता, त्या डॉक्टरांकडे कुठलीही पदवी, कागदपत्रे आढळून आली नाहीत.

शिवाय, रुग्णालयाच्या नाेंदणीचे कागदपत्र आढळून आले नाही. दाखल असलेल्या रुग्ण महिलेचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचे पथकातील महिला डॉक्टरांनी पाहिले. त्यांनी तातडीने त्या महिला रुग्णास उदगीर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. पोलिसांनी अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टराला ताब्यात घेतले आहे. त्याचबराेबर रुग्णालयात गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि गाेळ्या आढळून आल्या असून, त्या जप्त केल्या आहेत. 

याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार फुलारी यांनी सांगितले.

Web Title: A crackdown on illegal abortions in Udgir; Police, doctors raid the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.