आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना'
By हणमंत गायकवाड | Published: April 4, 2023 05:35 PM2023-04-04T17:35:27+5:302023-04-04T17:35:44+5:30
१५ एप्रिलपासून सेवा : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
लातूर : गोरगरिबांच्या सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धनी केंद्र सुरू होत आहेत. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित होणार आहे. आरोग्यवर्धनी केंद्र आणि आपल्या दवाखान्यासाठी इमारती भाड्याने घेतल्या असून मनुष्यबळासह यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ १ मे पासून होत असला तरी जिल्हास्तरावरील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.
१८ आरोग्यवर्धन केंद्र नगरपालिका क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहेत. तर दहा ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल. १ मे रोजी एकाच वेळी ही सर्व २८ केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग गतीने कामाला लागला आहे. कामगार दिनापासून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा शासनाने जाहीर केले असले तरी १५ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होतील. मनुष्यबळाची भरती, दवाखान्याची इमारत, यंत्रसामुग्री याबाबतची सर्व तयारी झाली आहे. पुढील आठ दिवसांमध्ये औषधे व अन्य साहित्याची खरेदी होणार आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्यसेवा....
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक डॉक्टर, नर्स, दोन शिपाई अशी पदे भरण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या संस्थांच्या धर्तीवर सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्यवर्धिनी केंद्रातून होणार आहे.
इथे असेल आपला दवाखाना.....
लातूर शहर, अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट आदी ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत आहे.
लातूर शहरांमध्ये ११ आरोग्यवर्धन केंद्र...
लातूर शहरामध्ये एक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ११ आरोग्यवर्धन केंद्र असतील. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागअंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्राचे कामकाज असेल. लातूर मनपाकडून शहरातील आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये १० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि १८ ठिकाणी आरोग्यवर्धनी केंद्र सुरू होत आहेत. या केंद्रांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १५ एप्रिलपासून सेवा सुरू होईल. १ मे रोजी या केंद्राचे डिजिटल उद्घाटन होणार आहे. पदभरती आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. औषधी खरेदी आठ दिवसांत होईल.
- डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर