चोरीचा वेगळा पॅटर्न; बांधकामांवरील साहित्य पळवणारी 'डोकेबाज' टोळी जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: November 23, 2022 05:11 PM2022-11-23T17:11:26+5:302022-11-23T17:12:24+5:30
या टोळीतील सहा जणांना अटक, चार वाहनांसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. टोळीतील एकूण सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांच्याकडून चार वाहनासह २२ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात झालेल्या घरफोड्या, चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या शोधाचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने आरोपींची शोधमोहीम हाती घेतली. जिल्ह्यातील नदी, रस्त्यावरील पुलाचे लोखंडी प्लेट्स, त्याचबरोबर विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. चोरीतील मुद्देमाल लातूरनजीकच्या भांबरी परिसरात गोडावूनच्या पाठीमागे ठेवण्यात आले आहे. हे साहित्य चार वाहनातून विक्रीसाठी नेले जाणार आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने भांबरी परिसरातील तीन गोदामांनजीक छापे मारले. यावेळी विविध प्रकारचे लोखंडी साहित्य वाहनात भरताना काही व्यक्ती आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याचा उलगडा झाला.
या सहा जणांना घेतले ताब्यात...
स्थागुशाच्या पथकाने रामेश्वर चंद्रकांत हाके (२७, रा. आसराची वाडी ता. रेणापूर), प्रशांत अशोक गाडेकर (२७, रा. भादा, ता. औसा), श्रीकांत चंद्रकांत हाके (१८, रा. आसराचीवाडी, ता. रेणापूर), विष्णू भगवान केकान (३६, रा. चाटगाव, ता. धारूर), दिगंबर भागवत गवळी (२९, रा. सिंधगाव, ता. रेणापूर) आणि ऋषिकेश ऊर्फ अप्पा गुरुलिंग शेटे (२२, रा. कुलस्वामिनी नगर, लातूर) यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली...
ताब्यात घेतलेल्या सहा जणांची चौकशी करण्यात आली. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लातूरसह वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावरील, नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून हे लोखंडी साहित्य चोरल्याची कबुली दिली. याबाबत लातूर ग्रामीण, औसा, रेणापूर, गांधी चौक आणि गातेगाव पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केला आहे.