शेतीच्या वादातून मिरची पावडरचे पाणी अंगावर टाकून कुटुंबास मारहाण
By राजकुमार जोंधळे | Published: May 8, 2023 05:06 PM2023-05-08T17:06:06+5:302023-05-08T17:06:26+5:30
या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लातूर : शेतीच्या कारणावरून मिरची पावडरचे पाणी टाकून तिघांना काठीने जबर मारहाण केल्याची घटना लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) येथे घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात आज पहाटे आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाेक सूर्यभान जाधव (वय ६५, रा. सलगरा, ता. लातूर) व दत्ता नरसिंग गायकवाड हे सख्खे मेहुणे असून, त्यांच्यामध्ये शेतीचा वाद आहे. फिर्यादीसह त्यांचे दाेन मुले हे ४ मे राेजी शेताकडून घराकडे निघाले हाेते. दरम्यान, दत्ता गायकवाड याच्यासह अन्य सात जणांनी त्यांना १४ गुंठे जमीन माझी आहे. त्या जागेवर तुझा काय अधिकार आहे? असे म्हणाले. यावर फिर्यादी यांनी सांगितले, ती जमीन माझी आहे, मी तुम्हाला फूटभरही देणार नाही, असे म्हणताच तुला पैशाचा घमंड आला आहे. तुला तर आज जिवंत साेडणार नाही, म्हणून शिवीगाळ करुन घराबाहेर येत मिरची पावडरचे पाणी फिर्यादीच्या अंगावर टाकले.
दरम्यान, यावेळी फिर्यादीचे दाेन्ही हात पकडून डाेक्यात, छातीवर, मानेवर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. त्याचबराेबर फिर्यादीच्या मुलाच्या डाेक्यात, हातावर, पायावर काठीने मारहाण करुन जखमी केले. तर माेठ्या मुलाला आणि आईला ही मारहाण करण्यात आली आहे. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आज पहाटे लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.